चरित्र
पेशवेकालीन संत तुकाविप्र महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील एक महान सत्पुरुष होते
संत तुकाविप्र – जीवन
तुकाविप्र महाराज यांचा काळ हा शके १६५० ते शके १७१४ म्हणजेच इसवी सन १७२८ ते इसवी सन १७९२ हा होता . हा काळ उत्तर पेशवाई म्हणून ओळखला जातो. तुकाविप्र महाराज हे आपला जन्म कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी असे मानत असत हे त्यांच्या अनेक अभंगातून लक्षात येते. तसेच भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ही त्यांच्या अभंगातून जाणवते. तुकाविप्र महाराज हे वारकरी पंथाचे होते . पंढरपूरची वारी करीत भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला. तुकाविप्र महाराज हे जन्माने ब्राम्हण होते त्यामुळे त्या समाजात असलेल्या काही ठराविक परंपरांचेच पालन करत असत. संत हे नेहमीच परंपरेचा धागा न सोडता आणि त्यात न अडकता वाटचाल करत असतात. म्हणूनच जास्त कर्मकांड करणे हे तुकाविप्र महाराज यांच्या दिनक्रमांचा भाग नव्हता. स्वत:च्या वडिलांच्या श्राद्धाला ब्राम्हणांना जेवण देण्याऐवजी गरजू ब्राम्हणेतर लोकांना अन्नदान करणाऱ्या संत एकनाथ महाराज यांची थोर मातृवंश आणि गुरु परंपरा लाभलेल्या तुकाविप्र महाराज यांनी देखील कधीही कर्मकांडांचा प्रचार वा प्रसारही केला नाही. वेदांचा अभ्यास करून त्यातील मर्म हे वेद बोलती सकळा | भाव धरा येक भोळा या सोप्या शब्दात मांडले.
संत नामदेव व संत तुकाराम यांनी जगाची उपेक्षा न करता त्याच जगात वावरत जन सामान्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले. अश्या महान संतांचे कार्य पुढे चालवणे या साठी आपला जन्म आहे असे आपल्या अभंगातून तुकाविप्र महाराज यांनी व्यक्त केले आहे. तुकाविप्र महाराज यांनी योग विद्येचे संपूर्ण ज्ञान असतानाही त्या मार्गाने जाण्याऐवजी त्यांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे त्यांच्याठायी पक्के होते.
तुकाविप्र महाराज यांचे साहित्य अद्यापही म्हणावे तेवढे समाजात पोहोचले नाही. संत साहित्याच्या अभ्यासकांनी, समाज-प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार यांनी या संत साहित्याला समाजाभिमुख करण्यासाठी आपापल्या परीने कार्य करायला हवे असे वाटते .
संत तुकाविप्र – जन्म
तुकाविप्र महाराज यांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी शके १६५० ला झाला त्यांच्या जन्माचा दाखला देणारा त्यांचा अभंग
श्रावण कृष्ण आष्टमी | पूर्व नेमी जन्म हा
सोळा शत नी पन्नास | शक खास जन्माचा
सौम्य नाम संवत्सर | कृपावर पूर्व जी
तुकाविप्र जाला जन्म | नाम वरं कीर्तना
संत तुकाविप्र – गुरु परंपरा
तुकाविप्र महाराज यांची गुरुपरंपरा आदिनारायणा पासून खालील प्रमाणे सांगितली जाते.
दत्तात्रय – जनार्दन स्वामी – संत एकनाथ – अनंत – विठ्ठल – विप्रनाथ – संत तुकाविप्र
संत तुकाविप्र – पितृवंश
तुकाविप्र महाराज यांचे पूर्वज म्हणजे विपट आडनाव असलेले कुटुंब हे रहीमतपुर येथील राम मंदिराची व्यवस्था व पूजा करत असत. तुकाविप्र महाराज यांच्या पणजोबा म्हणजे प्रल्हादपंता हे राजकिय व सामाजिक अस्थिरतेमूळे रहीमतपूर सोडून पंढरपूरला आले. तेथे ते विठ्ठलाच्या मंदिरात गंध उगळण्याचे काम करत असत. त्यांच्या मुलांचे नाव गंगाधर पंत होते . गंगाधर पंत यांच्या मुलांचे नाव भगवंतराव विपट होते . भगवंतराव विपट हे छत्रपती शाहू महाराजांचे एकनिष्ठ सरदार होते त्यांचा विवाह विप्रनाथ यांची कन्या चिन्मयी (चिमाई) यांचाशी झाला
असा तुकाविप्र महाराज यांचा पितृवंश आहे.
संत तुकाविप्र – मातृवंश
संत एकनाथ हे भानुदास महाराजांचे वंशज म्हणजे पणतु होते . भानुदास महाराजांचे चुलत बंधू केशवस्वामी हे देखील त्या काळचे विद्वान होते. केशवस्वामींचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील शेंदरे – वेचले येथे होते असे श्री मोरेश्वर जोशी येळंबकर यांनी आपल्या मराठवड्यातील संतांची जीवनगंगा या आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
केशवस्वामी – श्रीपति – माधव – यादव – गोविंद – गोपाल – अनंत – विठ्ठल – माणिक(विप्रनाथ) – चिन्माई (तुकाविप्र महाराज यांची आई) – तुकाविप्र
संत तुकाविप्र – उपनयन
तुकाविप्र महाराज यांची मौंज ही वैशाख शके १६५५ ला झाली असावी. तुकाविप्र महाराज हे ५ वर्ष वयाचे होते तेंव्हा त्यांचे गुरु व आईकडील आजोबा असलेल्या नाथवंशीय विप्रनाथ स्वामी यांनी तुकाविप्र महाराज यांच्यावर उपनयन संस्कार केले असा उल्लेख आहे
संत तुकाविप्र – विद्याभ्यास
तुकाविप्र महाराज यांच्या शिक्षणाचा पहिला भाग वयाच्या पाचव्या वर्षांपासून सातव्या वर्षापर्यंत, श्री विप्रनाथ स्वामी यांच्या जवळ झाले . त्यानंतरचे शिक्षण त्यांनी नीरा नरसिंगपूर येथे घेतले. तुकाविप्र महाराज यांच्या साहित्यातून त्यांचे संस्कृत भाषेचे व व्याकरणाचे ज्ञान अफाट होते हे लक्षात येते . तुकाविप्र महाराज यांनी चार वेद, १०८ प्रमुख उपनिषदे, सहा शास्त्र, अठरा पुराणे त्याच बरोबर विवेक चूडामणि, पंचदशी, विवरण यांचाही अभ्यास केला आहे यांचीही खात्री त्यांच्या साहित्याच्या अवलोकनातून पटते. तुकाविप्र महाराज यांना गायनकला देखील अवगत होती ज्याचा उपयोग ते कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी करत असत.
संत तुकाविप्र – लग्न
तुकाविप्र महाराज यांच्या आईचे निधन शके १६६० ला झाले त्या आधी त्यांचे लग्न झाले होते व लग्नाच्या आधी नीरा नरसिंगपुरचे शिक्षण झाले. तुकाविप्र महाराज यांचे सुरुवातीचे शिक्षण शके १६५७ पर्यंत (यावेळी तुकाविप्र महाराज हे ७ वर्षे वयाचे होते) म्हणजे त्यांच्या गुरूंच्या (विप्रनाथ स्वामी यांच्या निधना पर्यंत) झाले असे मान्य करून त्या नंतर १६५८-५९ ला त्यांचे नरसिंगपुरचे शिक्षण संपले असावे व त्याच दरम्यान किंवा शके १६५९-६० ला तुकाविप्र महाराज यांचे लग्न झाले असावे असा निष्कर्ष काढता येतो . लग्नाच्या वेळेस तुकाविप्र महाराज यांचे वय ९ ते १० वर्ष असावे. तुकाविप्र महाराज यांनी लग्नानंतर अजन्म असिधारा वृताचे पालन केले . असिधारा म्हणजे पत्नीशी शरीर संबंध न ठेवता तीला देवतेसमान समजणे.
संत तुकाविप्र – वास्तव्य
शके१६५० ते शके १६५७ – अंजनवती, जिल्हा बीड
शके १६५८ ते शके १६६० – नीरा नरसिंगपूर
शके१६६० ते शके १६६६ – महाराष्ट्रभर प्रवास
शके १६६७ ते शके १६७८ – ब्रम्हपुरी – जिल्हा सातारा
शके१६७९ ते शके १६९० – बोरबन – जिल्हा सातारा
शके १६९२ ते शके १७०४ – कऱ्हा नदीची प्रदक्षिणा
शके१७०५ ते शके १७१४ – पंढरपूर – जिल्हा सोलापूर , अंजनवती आणि विविध ठिकाणी प्रवास
तुकाविप्र महाराज यांचे साहित्य
भागवताच्या सर्व भागावर अभंगात्मक टीका
शतकोटीचे अभंग

तत्वमसि पान १
तत्वमसि
सुदामचरित्र
भानुदास चरित्र
कालियामर्दन
पंढरीपर अभंग
नरदेह महिमा अभंग
इतर संतावरचे अभंग
विठ्ठलावरील पोवाडा
अनेक पदे
आरत्या
यातील सर्व साहित्य हे १९५६ पर्यंत पंढरपूर येथील विप्र दत्त मंदिर येथे होते असे समजते कारण 1944 साली इतिहास संशोधक श्री रा. ग हर्षे यांनी पंढरपूरातील मठांचे सर्वेक्षण केले होते यावेळी या साहित्याच्या उपलब्धतेची नोंद झाली असा उल्लेख श्री वा.ल. मंजुळ यांनी या सर्वेक्षणावर आधारित लिहिलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरातील मठांचा इतिहास
या पुस्तकात केला आहे. इसवी सन 1956 साली चंद्रभागेला आलेल्या महापूरात यातील बरेच साहित्य नष्ट झाले असे विप्र कुटुंबीय सांगतात. असे असूनही तुकाविप्र महाराज यांचे उपलब्ध साहित्य बरच आहे . ते पुनर्लिखित , मुद्रित हस्तलिखित स्वरूपात आहे असे समजते.