चरित्र
पेशवे कालीन संत तुकाविप्र यांचा जन्म- श्रावण वद्य अष्टमी शके १६५० ला झाला तर त्यांनी समाधी – पौष कृष्ण चतुर्दशी शके १७१४ ला घेतली. यांनी रचलेल्या साहित्यात – शतकोटीचे अभंग, अभंग गाथा, स्फुट अभंग, अभंग भागवत, तत्वमसि महावाक्य निरूपण, हरीपाठाचे अभंग, समकालीन तसेच इतर संतावरील अभंग, पंढरीवरील अभंग, समाज-उपदेश पर अभंग यांचा समावेश होतो.
मराठी वाङ्मय कोश खंड १ पान क्रमांक ११६ व ११७ यावर संत तुकाविप्र यांची माहिती दिली आहे ती याप्रमाणे
भागवत संप्रदायी कवी – संपूर्ण नाव – तुकाराम भगवंत विपट – देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण , सातारा जिल्ह्यातील रहीमतपुर गावाचे हे कुळकर्णी . तपश्चर्येसाठी हे कृष्णा काठच्या तारगांवच्या बोरवनात बसत असत . ह्यावरून त्यांच्या वंशजास बोरवणकर असे उपनांव पडले. तुकाविप्र यांच्या आईचे नाव चिमणा बाई. गुरु – विप्रनाथ – हे यांच्या मातुश्रीचे वडील . संत तुकाविप्र यांचा संबंध त्यांच्या मातृ वंशाकडून संत एकनाथांपर्यंत पोहोचतो. एकनाथांचे भागवत संप्रदायी वारस व चुलत घराण्यातील पुतण्याचे चिरंजीव जे आनंतबोवा यांच्या वंशातील विप्रनाथ हे एक सत्पुरुष . ह्यांची गुरु परंपरा अशी – एकनाथ – अनंत – विठ्ठल – विप्रनाथ – तुकाविप्र. विप्रनाथ हे ह्यांचे गुरु असल्याने हे स्वत:चा नामनिर्देश तुकाविप्र असा करत.
रोज किर्तन करण्याचा संत तुकाविप्र यांचा संकल्प असे.
६४ वर्षे आयुष्य लाभलेल्या संत तुकाविप्र यांनी वयाच्या १४ व्या वर्षीपासून रोज किर्तन केले म्हटले तरी पूर्ण आयुष्यात त्यांनी 18250 किर्तन केली .
ह्याकरिता अखिल महाराष्ट्रभर त्यांचा संचार होई व भगवतभक्तीचा प्रचार चाले. संत तुकाविप्र यांना सातारकर छत्रपती , श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब पेशवे फार मानीत असत . मोठे मोठे सरदार – जहागीरदार संत तुकाविप्र यांच्या शिष्य मंडळात होते. देशावर आणि कोकणात संत तुकाविप्र यांना अनेक इनामे मिळाली होती. तरीही संत तुकाविप्र हे विरक्त वृत्तीने राहत . त्यांच्याजवळ शीघ्र-कवित्व होते. नामदेवाची शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पुरी केली. संत तुकाविप्र यांची समाधी खर्डयापासून १० मैलांवर अंजनवतीस आहे.
संत तुकाविप्र समाजापर्यंत पोहोचावे म्हणून
https://www.facebook.com/SaintTukavipra हे फेसबूम पेज कार्यरत आहे. या पेजवर त्यांची माहिती देणारी 80 भागांची लेखमाला चालू आहे .
https://mr.wikipedia.org/wiki/तुकाविप्र या विकिपीडिया लिंकवर देखील संत तुकाविप्र यांची माहिती आहे.
संत तुकाविप्र यांची अंजनवती ते पंढरपूर व अंजनवती ते पैठण अशी दिंडी निघते.