संत तुकाविप्र रचित ज्ञानेश्वर चरित्र

सद्गुरु कृपेचा | अगाध महिमा । वेदा जाली सीमा | वर्णु जाता ।। 

तेथे पाड काय | इतर वाणीचा । महिमा गुरुचा | वर्णावया ।। 

सद्गुरु कृपेची | अगाध करणी । कीर्तन रंगणी | उमटली ।। 

श्रोता वक्ता उभा | विठ्ठल समर्थ | वदवी यथार्थ | जाले तैसे ।। 

 

गौतमी तटाकी | आपेगांव क्षेत्र । परम पवित्र | पूण्यभूमी ।। 

तेथील गोविंद | पंत कुलकर्णी । विठ्ठल स्मरणी | सर्वकाळ ।। 

नीराबाई पुण्य | पवित्र अर्धांग । भरीव सर्वांग | प्रेमसदा ।। 

पंढरीची वारी | आषाढी कार्तिकी । भावभक्ती नीकी  | जया घरी ।।

 

पुत्र संततीची | धरोनीया आस । विनवी देवास | निराबाई ।। 

हरि गुरुभक्ति | परायेण पुत्र । परम पवित्र  | व्हावा येक ।। 

देवा विनविता | प्रसन्न जाहाले । आपण आले | मुख्य पोटा ।। 

नवविधा भक्ती | भावे आवडली । निराबाई जाली | पुत्रवती ।।

 

स्वयंभ ज्ञानाचा | पुतळा विठोबा । जयाचेनी शोभा | सर्व कर्मा ।। 

कर तळा मळ |  जया वेद चारी । निपुण अंतरी | सर्व विद्या ।। 

पाचवे वरुषी | जाला व्रतबंध । ज्ञानी विठो शुद्ध  | आयताची ।।

गोविंद निराई | विठोबा सहित । करावया तीर्थ | चालियेले ॥ 

 

करोनिया तीर्थ | उत्तर मानस । दक्षिण मानस |  करु आले ||

आळंदीसी आले | इंद्रायणी तीरी । यात्रा सिद्धेश्वरी | उतरले ||

कुलकर्णी तेथे | मुख्ये सिद्धोपंत । गिरजेचा कांत | सत्वगुणी ।।

गीरीबाई सिधो | पंत उभयता । येवोनी समस्ता | प्रार्थियेली ॥ 

आश्रम पवित्र | करावा समर्थी । केली सिधोपंती | विनवणी ||

यात्रा समारंभ | आणिला घरासी । भक्ती भावार्थेसी | पूजावया  ॥ 

नवविधा भावे  | पूजन भोजन | यथाशक्ती दान | सर्व केले ||

आनंद लोटला | अर्घ विसीवरी । निद्रा अवसरी | स्वप्न जाले ॥

 

सीघोपत गीरी | बाई पोटी धन्य । कन्या एक रत्न | नवसाचे ॥

रख्मा देवी नाम | लावण्य सुंदरी । रूप मनोहर | आदिमाया ।।

स्वप्न झाले ऐसे  | कन्या ही सुंदरी। बांधावी पदरी | विठोबाच्या।।

गीराबाई सिधो | पंत हरुषले  | बहु बरे जाले | देवराया ।।

 

तेथे तेथे स्वप्न | सारखे जाहले | लग्न लावियेले | समारंभ ।।

लग्न विधी यथा | स्थित उरकिला । निरोप घेतला | विठोबानी ||

दक्षिण मानसे | करोनिया तीर्थे । पावले भावार्थे | कासीपुरा ।। 

माता पिता यासी | देवाज्ञा जाहली । वैकुंठासी गेली | उभयता ।। 

 

वर्णाश्रम विध | सर्व उरकला | संन्यास घेतला | विठोबाने ।। 

नरसी आश्रम | याचे दीक्षाघारी । साधियेली थोरी | शांती क्षमा ।। 

चैतन्ये आश्रम | नाम ठेवियेले | तीर्थे चालविले | करावया ।। 

शिष्ये समुदाय | सहित नरसी । आश्रम तीर्थासी | चालीयेले ॥

 

धरोनिया हेत |  दक्षिण भारत । पातले तीरास | इंद्रायणी ।। 

आळंदी नगर | प्रवेश करिता । भेटी सिधोपंता | प्रथमची ||

साधु सीधोपंत | आश्रयासी नेले । विठोबा देखिले | रख्माईने ।।

गीर्जाबाई कानी | सांगितली मात । पाहोनी एकांत | रख्माईने ।। 

चैतन्ये आश्रम | म्हणती जयाला | भ्रतार आपुला | तो चि होये ।।

विभ्रांत ओळखी | पुरली सर्वांची । सीधोपंत साची | प्रश्न केला।। 

 

सरस्वती स्वामी |  साष्टांग नमिले । वृत्त सांगितले | होते तैसे ।। 

नरसे ही खूण | अभंग पुरली । रुक्माई दिधली | विठोहाती ।। 

गुरु आज्ञा मुख्य | मानुनी विठ्ठले । अंगिकारीयेले | रुक्माईसी ।। 

विचारले स्वामी | होईल संतती । याची काय गति | पुढे कैसी ।।

 

नरसी आश्रम | बोलियेले बापा । होय गुरुकृपा | सुखे होकी ।। 

ब्रह्मा विष्णु सीव | आदिमाया च्यार। बाळे धुरंधर | पोटा आली ।। 

चारी बाळे होता | उभयता गेली । वैकुंठासी भली | ब्रह्मानंदे ।। 

उरली ही चार | बाले निराश्रित । न करिती व्रत | बंध कोणी।। 

 

संन्यास्याची मुले | म्हणुनी हेळती । तेणे चौघा चित्ती | उद्विग्न   ।। 

निवृत्ती सोपाने | विचार बोलिला । जावे पैठणाला | ज्ञानदेवा ।। 

अवश्य म्हणोनी | वंदिले चरण । चालीले पैठण | पाहावया ।। 

पतित जनाचा | फेडावया पांग । चालीले अभंग | देव चारी ।।

 

पावले पैठण | नमीले भूदेव । सांगितला भाव | स्वागताचा ।।

व्रतबंध होणे | म्हणोनिया आलो । पाहोनी तोषलो |  द्विजवरा ।।

जेणे लाभे आम्हा | पवित्रता गाढी । ते युक्ती रोकडी |  करावीजी ।।

द्विज वरा भावे | करोनी विनंती । उभ्या वेदमूर्ती | बाळ जैसे ।।

संन्याशाची मुले | द्वेषिती म्हणोनी । शास्त्रार्थ पाहोनी | सकळही ।।

न मानिती द्विज |  हेळोनी बोलती । ज्ञानदेवा चित्ती  |अनुताप ।।

बोलियेले द्विज | असता रे मुला । तेधवा बोलीला | ज्ञानदेवो ।।

कासयाने थोरी | तुजलारे आली । अहंकार भुली | सांड आता ।।

 

वाचोनी पढोनी | शहाणे जाहाला । थोरपणा आला | तेणे काय ।। 

उलीस दिसत |  म्हणताती पोर । बोले विचारोत्तर  | बरं की हो ।।

ज्ञानोबा म्हणती | द्विज हो ऐकारे। ब्रह्म ठावे आम्हा | सर्व घरी ।।

ते क्षणी टोणगा | त्याच ठायी आला। वरुनी पाखला | भरोनिया ।।

 

ज्ञानेश्वराकडे |  पाहोनी रोकला । ज्ञानदेवे केला | नमस्कार ।। 

का रे केले पोरा | नमन तयासी । तुम्हा आम्हा त्यासी | भेद काये।। 

खवळले द्विज | ऐकोनिया बोल । समता होईल | कैसी पोरा ।।

वेद म्हणू आम्ही | तैसा म्हणे काय । म्हैसा येक होय | द्विज कसा ।। 

 

नवल या गोष्टी | काय द्विजराव । करी तरी देव | काय नव्हे ||

हाचि रेडा वेद | करील उच्चार । ऐसे ज्ञानेश्वर | बोलियेले ।। 

सर्वांगे भरला | द्विजाचिया कोप । पावला संकल्प | रेडियासी ।। 

बोलेन हा रेडा |  वेदा पोरा आता । नाही तर जाता | जीवे च्यारी ।। 

या चि रेड्यापाई | नेमीले मरण । न बोलता जाण | वेद रेडा ।। 

ज्ञानोबा म्हणती | ऐका महाराज। येथे काय काज | बहु बोली ।। 

 

निवृत्ती बोले | स्थीर करोनी बैसा । बोलेल हा म्हैसा | वेदचारी ।।

हासीनले सर्व | बैसले निवांत । वदला वेदांत | पशुरेडा ।। 

सांगोपांग  चहु | वेदांचा उच्चार । केला द्विजवर | डोलविले ||

जै जै कार केला | स्वर्गी सुरवरी । विमाने अंबरी | पुष्पवृष्टी ।।

 

प्रतिष्ठान पुरा | आनंद ओतला । रेडा बोलविला | ज्ञानदेवे ।।

संतोषले देव | द्विज सकळीक । पंडित वैदिक | अग्निहोत्री ।।

शास्त्री पुराणिक | योगी वीतरागी । राव रंक मुंगी | संतोषले ।। 

साष्टांग नमिले |  सर्वी ज्ञानेश्वर । सत्य अवतार | म्हणवोनी ।। 

 

निरोप घेवोनी | तैसेचि निघाले। नेवासीया आले | ब्रह्मानंद हे ।। 

मोहनी राजाचे | देवालयी वास। केला अनायास | मार्गी जाता ।। 

तेथे सचोपंत | बाबा ठाणेदार । पंताचे चाकर | हेमाद्रिया ।। 

रामदेव राजा | प्रधान हेमाद्रि । दोघे अवतारी | पुण्यवंत ।।

 

गीतार्थेसी चाली | अभंग जयांची । आवडी गीतेची | राया मना ।।

लंकेशी हेमाद्री | पंत जेव्हा गेले। छप्पनही आणिले | ग्रंथ त्यानी ।। 

छपन्न भाषेचे | छपन्न ही ग्रंथ । पाहिले यथार्थ | शोधोनिया ||

राया मनी अर्थ | एकही न वाणे। गीता योग्य लेणे | अर्थ नोहे ।। 

 

गीतार्थ नेटका प्राकृत पाहावा । राजयाच्या जीवा वेध ऐसा ।।

नेवासीच्या मध्ये | संचोपंत होते । सकळ भावार्थ | ज्ञान सिंधु ।। 

तथा हटकीले | हेमाद्री पंतानी । तेचि आले दिनी | ज्ञानेश्वर ।। 

सचोपंत बाबा | दौलताबादेसी । तूर्त जावयासी | निघालेली ।। 

देवाचे दर्शन | घ्यावया चालिले । ज्ञानोबा भेटले | देवद्वारी ।। 

नमन साष्टांग | घालोनी विनंती । केली सचोपंती | ज्ञानदेवा ।। 

मज आले जाने | दौलताबादेसी | राज आज्ञा ऐसी | तूर्त आहे ।।

परतोनी भेटी | याची स्थळी व्हावी। ये विंसी करावी | आज्ञा काय ।। 

 

करा कार्य सिद्धी | भेटी परतोनी | होईल कीर्तनी | याच स्थळी ।। 

आज्ञा वंदोनीया | पंत चालीयेले। दौलता पातले | बाद किल्ला ।।

हेमाद्रीपंताचे | दर्शन होतांची । मुख्य काज हेचि | सांगितले ।। 

गीतेचा प्राकृत  | अर्थ कोणी करी। ऐसा पृथ्वीवरी | शोधकरा ।। 

आज्ञा म्हणोनिया  | निरोप घेतला । नेवासे पातला | सचोपंत ।। 

ज्ञानदेवा केले | नमन साष्टांग । वृतांत अभंग | सांगितला ।। 

आज्ञा आता काय | करणे करावी। कार्य सिद्धी व्हावी | तूर्त ऐसी ।।

निवृत्ती बोलले | ज्ञानोबा ऐकावे । कार्य त्या करावे | गृहस्थाचे ।।

 

बरे म्हणोनिया | दिधला निरोप । तरणि प्रताप | ज्ञानराये ।। 

सचोपंत गेले | आपुल्या घरासी । लागले ग्रंथासी | यत्नाचिया ।। 

शाई केली साचे | कातरीले बरे । लेखण्या सुंदरे  | सिद्ध केल्या ।।

निवृत्ती सोपान |  मुक्ताई निजेली। ज्ञानदेवे केली | युक्ती गाढी ।। 

 

कोळसा घेवोनी | देवालयावरी । गीता ज्ञानेश्वरी | अर्थ केला ।। 

साडेतीन घटीका | ओवी टीपण । गीतार्थ प्रमाण | निवडला ||

प्रातःकाळ होता | सचोपंत आले । नमन घातले | ज्ञानदेवा ।।

शाई साच्या सिद्ध | लेखणी या स्वामी। ग्रंथ मनोधर्मी | सिद्ध व्हावा ।। 

 

ज्ञानोबाने तया | दाविले देऊळ । लिहीले सजळ | गीतार्थाने ।। 

गीतार्थ लिहीला | देऊळा वरुता । येतो कैसा हाता | तुर्तातूर्त ।।

मायोत्तरे काज | अपूर्व जाहाले | परंतु राहिले | भिंतीवरी ।।

सचोपंत बाबा | तेणे चिंतातूर । देखिले साचार | निवृत्तिने ।।

निवृत्ती म्हणती ज्ञानोबा सुजाणा । मनीचिया जाणा गृहस्थाचे ।।

आज्ञा म्हणोनिया | लेखणी धरीली । ते लिहावे दिली | सचोपंता ।।

 

साडेतीन घटका | ग्रंथ जाला सिद्ध । सर्वगुण शुद्ध | निरुपम ।। 

गतकाली चार | हजार तीनशे । नव्वद वरुसे | लोटलीया ।। 

शालीवान शके |  बाराशे बारात । सिद्ध झाला ग्रंथ |  ज्ञानेश्वरी ।।

लेखीक जाहाले | सदाचिदानंद । बाबा नाम शुद्ध | सचोपंत ।। 

 

टोणग्याचे मुखे | वेद सिद्ध केला | तैसेचि हा केला | कीर्तीघोष ।। 

साडेतीन घटीका | ग्रंथ सिद्ध केला । पुढे देखियेला | सचोपंत ।। 

ते चि क्षणी सिद्ध | सचोपंत जाले । चरण वंदिले | ज्ञानोबाचे ।।

ग्रंथ पाठविला |  दौलता बादेशी | हेमाद्री पंतासी | ब्रह्मानंद ।। 

 

राजा सदरेसी | बैसला उदार । सर्वज्ञ चतुर | ज्ञाननिधी ।। 

तया पुढे ग्रंथ | आणोनि ठेविला । राजा संतोषला | बहु तेणे ।।

सचोपंती आज्ञा |  राया मागितली । चाकरी ठेविली | पायावरी ।।

पुत्राचिया नांवे | धंदा मागितला । निरोप दिधला | सचोपंता ।। 

 

हेमाद्री पंतानी | वाचियेला ग्रंथ | राये केला अर्थ | मना ऐसा ।। 

वाक निसे अर्थ | पारसी लिहीला । राजा बोलियेला | जैसा तैसा ।। 

येक पारायणी | जाला वीतराग । केला राज्ये त्याग | मनोभावे ।। 

राज्ये कारभार |  केला स्वाधीन पुत्राचे । घ्यावया ग्रंथीचे | सर्व सुख ।।

 

घेवोनिया ग्रंथ  | वेरुळासी गेले । गुंफेत शिरले | चौघेजण ॥

प्रधान हेमाद्री | राजा सेनापति । वैराग्य विभूती | लेवोनिया ।।

पाणका ब्राह्मण | भोळा ऐसे चार । जाले शुद्ध नर |  वीतरागी ॥

अमर असावे | न मरावे कदा । आनंद सर्वदा | सर्वकाळ ।। 

 

सर्व गुण ऐसा | ग्रंथ संपादित । येवोनी गुंफेत | प्रवेशले ।।

सचोपंत बाबा | नेवासे पातले । साष्टांग नमिले | ज्ञानराज ||

गेलीया पासोनी | जाले वर्तमान । देवापासी ज्ञान | सांगितले ||

बरे जाले आता | देऊळीचा लिखा । उतरा नेटका | पत्रावरी ॥ 

 

येक मासाग्रंथ | पत्री उतरला । लिखा तो पुसिला  | देऊळीचा ।।

चौदा विद्या कळा | चौसष्टी साधने । नाना युक्तीधने  | तया ग्रंथी ।। 

निवृत्तिरायाने | बुडविला ग्रंथ । तोही पाणीयात | ज्ञानेश्वरी ।। 

सदाचिदानंद  | बाबानी विनंती । ग्रंथ असो क्षिती | स्वामीराया ।।

 

तेधवा तो ग्रंथ  | बाहेर काढिला । गळोनीया गेला | अर्थ काही ।। 

नाना कळा नाना | साधनाच्या युक्ती । गळाल्या समस्ते  | येकंदर ।। 

तुटक उरला | ग्रंथार्थ जेधवा । बोलीले तेधवा | ज्ञानदेव ।। 

पुढे अवतार |  एकनाथ होणे । तेधवा करणे  |शोध याचा ।। 

 

आज पासोनिया | प्रमाण होतील । दोन शत जाले | चौऱ्यानऊ ।।

ग्रंथाचा या शोध | तेव्हा एकनाथ। करील यथार्थ | प्रतिष्ठानी ।।

निघोनिया गेले | आळंदी क्षेत्रासी । वृत्त चांगयासी | कळलेही ।।

भेटीसी बैसोनी | वाघावरी आले । हाती धरियेले  | महाफणी ।। 

 

ज्ञानदेवा पुढे  | निरोप धाडिला । यावे भेटायला  | समारंभे ।।

ज्ञानोबा बैसले | होते भिंतीवरी । चालीले सामोरी  | चांगदेवा ।। 

देखोनिया वाघ  | भिंतीसी बुजला । टाकोनी दिधला | चांगदेवा ।। 

पडता धरणी | भूजंग पळाले । बारा वाटे चाले | चौदा शती ।। 

 

उरले चांगोबा | येकुलेते येक । पळाले सेवक | जवळीचे ।। 

चांगया ज्ञानोबा |  प्रीतीने भेटले । भेटीसी पातले  | मुक्ताईच्या ।। 

मुक्ताईचे भेटी  | जाला साक्षात्कार | चांगया साचार  | उद्धरिला ।।

पंढरीसी आले | भेटी नामयाचे । सख्यत्व जनीचे | पाहावया ।।

 

चोखामेळा गोरा | कबीर सावता । परसा भागवत |  नरहरी ।।

भाविकांच्या भेटी | जाहल्या सकळ । करु तीर्थावळ | चालीयेले ।।

जड मूढ प्राणी | उद्धरिले सर्व । रंक आणि राव | दरुषणे ।।

 

परतुनी आले | पंढरपुरासी । जोडियेल्या राशी | स्वानंदाच्या ।। 

तेथे आले राव पंडित चतुर । कोठे ज्ञानेश्वर म्हणोनिया ||

रेडियाचे मुखे वेद बोलविले । पंडित कोपले ऐकोनिया ||

ज्ञानेश्वरा वेद बोलविसी आता । पंडित बोलता बंका आला ।। 

 

बाईलेचा भाऊ चोखोमेळी याचे | बंकानाम त्याचे अतिशुद्र ।। 

ज्ञानोबा बोलती, गड्या तूं कोणरे । बंका मी महार बोलियेला ।। 

आडवी ओढली रेघ त्या पुढती । ज्ञानोबा बोलती आरता ये ।। 

बंका आला आंत रेघेच्या जेधवा । बोलविला कोण रे तू ।। 

 

बोलीयेला बंका शुद्र मी चांगला । वंदावया आलो संत पाया ।। 

दुसरी ओढली रेघ तयापुढे । आंत आला मग बोलविला ।। 

वैस्य मी चांगला बोलियेला बंका । पातलो पादुका बंदाबया ।। 

वोढियेली रेघ त्या पुढे तिसरी । येताच भितरी बंका बोले ।। 

 

कोण  विचारीता क्षेत्री बोलीताहे । वंदावया स्वामी पाये आलो ।। 

तयापुढे रेघ ओढिली चवथी । पालटली वृत्ती बंकयाची ।। 

विचारीता कोण ‘हरि’ ही वदला । बंका बोलयेला ब्राह्मण मी ।। 

आज्ञा काये स्वामी जोडियेले हात । ज्ञानोबा समर्थ संतराव ।। 

 

ज्ञानदेवे तेव्हा पंडिता दाविले | दंड थोपटीले वकयाने ।। 

ज्ञानदेवा केले पंडिते नमन । अवतार धन्य होयसी तू ।। 

चंद्रभागे जाता उभा उभी ऐसे । आनंद सरीसे काज केले ।। 

 

अवतार आला सेवटासी जेव्हा । चालीयेले तेंव्हा आळंदीसी ।। 

सनकादिकांचा घेवोनिया मेळा । चालीला सावळा आळंदीसी ।। 

संत समुदाय अनंत अपार । मध्ये ज्ञानेश्वर हरि गाती ।। 

इंद्रायणी तीर आळंदी पातले । तारु सांगितले ‘हरिपाठ’ ।। 

 

हरि नाम गर्जा नाही भय चिंता । खूण हे समस्ता सांगितली ।। 

धाव घ्यारे बापा पंढरपुरासी । ठाव समर्थकासी येतुलाची ।। 

डोळेभरी पहा पंढरीचा राणा । भावे ‘हरि’ म्हणा सर्वकाळ ।। 

विटेवरी उभे साकार सावळे । महद्भुत भोळे पंढरीचे ।। 

 

वेदांचे जीव्हार आगर सुखाचे । चोवीसा मूर्तीचे उद्धरण ।। 

वेदांत सिद्धांत जयाला वर्णिती । उभी ते हे मूर्ती विटेवरी ।।

सकळ जीवांचा उद्धार सगट । पंढरी वैकुंठ देखलीया ।। 

कोटी कळा मुक्ती पाहता कळस । खूण हे सर्वास सांगितली ||

 

विश्वास पंढरी तारील सकळा । पहा येक वेळ डोळे भरी ।।

हरिनाम प्रीती सकळ ही गर्जा । लावा कीर्तीध्वजा सूचविले ।।

चालीले समाधी ज्ञानेश्वर जेंव्हा । गजर नाना परी ।। टाळ वीणे, ।।

भेटी मृदुंग चिपळी । कीर्तन धुमाळी ब्रह्मानंद ।।

 

अंबरी दाटल्या विमानाच्या दाटी । देव पुष्पवृष्टी करताती ।।

धन्य ज्ञानदेवा मानव जालासी । जन तारायासी भक्तीभावे ।। 

जै जै कार केला सर्व सुरवरी । समाधी भिवरी प्रवेशिले ।।

अभय वरद वचन भाविक । दिले सकळीका येकंदर ।।

 

भक्तीभावे चाला बोला हरि गुण । तरा चारी वर्ण भवसिंधु ।।

सांडा काम क्रोध शांती क्षमाधरा । भव सिंधु तरा सकळीक ।। 

निरोप सकळा आशिर्वाद प्रीती । ज्ञानदेव देती तरावया ।। 

देव करील ते सहज होईल । पाषाण तारील जळावरी ।।

 

हरि भक्ती काजे सादर असावे । तरुनी तारावे आनिकासी ।।

जड मूढ जीव लावावे भजना । शेवट सुचना भाविका हे ।। 

सकळही नरा कीर्तनाचे वृत्ती । करा क्षिरापती खेळकाला ।। 

नका करु कथा बाजारी बाजार । माळ येकंदर लावू नका ।। 

 

खोटे ब्रह्मज्ञान कोणा सांगू नका। वाका संता पायी सर्व भावे ।।

नवविधा भक्ती नैराश्य कीर्तन । करावे साधन संत प्राये ।। 

हरि म्हणा आता समाधी बैसले । ज्ञानदेव गेले नीजधामा ।।

 

नित्य नेम कथा ब्रह्मपुरी वाणी । विठ्ठल रुक्मिणी उरुबुरु ।। 

चैत्र वसंत कृष्ण सप्तमीसी । भौमवार निशी कृष्णातीरी ।।

गत कली चार हजार आठशे । सत्तर प्रत्यक्ष चालीयेले ||

शालीवान शक सोळासे व्याण्णव । श्रोता वक्ता देव दत्तात्रेय ।।

 

सासवडी देवा सोपान समाधी । ब्रह्मगीरी मधी मुक्ताबाई ।।

समाधीस्थ जाले तीर्थ कुशावर्ती । शंकर निवृत्ती अवतार ।।

कृष्ण येकादशी कार्तिक आळंदी । अभंग समाची ज्ञानोबासी ।।

देवोनी समाधी सर्व सुरवरी । इंद्रायणी तीरी बास केला ।।

 

कनकाचा तरु जयाचिये द्वारी । इंद्रायणी तीरी आकंदीसी ।।

अज्ञान रोविला दंड तो द्वारेसी। पल्लव तयासी आझोनीया ।।

यात्रा समारंभ आजवरी मोठा । पंढरी बैकुंठा समसाम्ये ।।

आळंदी संताचे माहेर देखिले । पावन जाहाली जन्मांतर ।।

मोक्ष मुक्ती जया चरणा लागती । आळंदीसी जाती तयाचिया ।।

 

गुरुकृपे बीण ऐसे लाभ केचे । कृपे सद्गुरुचे सर्व लाभ ।।

गुरु कृपे तेथे सर्व सुख रासी । सप्त बोले ऐसी वेद श्रुती ।।

श्रोता वक्ता देव आपण जाहला चरित्र वदला कथारंगी ।।

ज्ञानोबाचा अवतार येकनाथ । वरदी श्रीदत्त प्रतिष्ठानी ।।

 

आदिनाथ गुरु श्री शिव शंकर । तयाचा मच्छेद्र उपदेसी ।। 

मच्छिंद्र नाथाचे गोरक्ष बरदी । तयाच प्रसादी गैनिनाथ ।।

गनीचे निवृत्ती पाद प्रसादित । तयाचा अंकीत ज्ञानदेव ।।

 

आदिगुरु परात्पर नारायण । तयाचे प्रमाण शिष्य अत्रि ।।

अत्रीचे श्रीदत्त दत्ताचे अंकीत, | अभंग कलीत, जनार्दन ।। 

जनार्दन वर येकनाथ राया । येकोबाची दया विश्वनाथ ।। 

विश्वनाथ राजा कृपा विश्वेश्वर । त्रिमुर्ती अवतार विप्रनाथ ।। 

विप्र चरणीचा, रजरेणू तुका । निमित्यासी लोका दाविताती ।।

तुकाविप्र म्हणे सद्गुरु महिमा | हरी हर ब्रम्ह जाणती ।।

Scroll to Top