आळंदी येथे रचलेले अभंग

अभंग १ 

ज्ञानदेवाची हे दशमी कार्तिक | समाधी कौतुक | कृष्णपक्ष समर्थ || १ ||

प्रथम दिवस उत्सवाचा नेम | कथा हरीनाम | इंद्रायणी तटाकी || २  ||

वैष्णवाची मांदी मिळाली अपार | कीर्तन गजर आळंदी या नगरी || ३ ||

संत सणकादी भक्त महाजन | देव दयाधन | आले राव पंढरी || ४ ||

तुकाविप्र हेत पुरे तात्काळची | कृपा ज्ञानियाची परी पूर्ण अभंग || ५ ||


अभंग २ 

विष्णु अवतार ज्ञानदेव संत। प्रमाण कलीत चालविती भिंताडे || १ ||

पशु रेडा वेद बोलाविला ज्यांनी प्रसिद्ध पैठणी गौतमीचे तटाकी || २ ||

भुदेवा संतोष बहुतचि केला । सत्य उगविला गीतार्थ जयाला || ३ ||

तुकाविप्र ऐसे थोर ज्ञानदेव । ज्यानी केला भव अवघाची कोरडा || ४ ||


अभंग ३ 

आवतार हे देव कलयुगी । ज्ञानदेव  मानव तनु जगी || १ ||

उद्धराया पतीत जन लोका। जड  मुढ आनाथ दिनरंका || २ ||

तुकाविप्र आभंग आवडीचा । ज्ञानदेव उघडा  प्रचीतीचा || ३ ||


अभंग ४ 

गीतार्थाचा जाला | घोटाळा बहुत । म्हणोनीया संत | आवतार || १ ||

ज्यानी केला बोध | आर्जुनासी प्रीती । तेची सत्य मुर्ती | ज्ञानराज || २ ||

तुकाविप्र म्हणे | ज्ञानेश्वर भले । आवतार  जाले | संतरूपे || ३ ||


अभंग ५ 

गीता भांडार उघडीले जेणे । उद्धरीले हे जन सर्व गुणे || १ ||

ब्रह्मांडासी नेवोनी ठेवियेला । प्रमाण हे प्रसिद्ध प्राण  भला || २ ||

तुकाविप्र हे ध्यान समाधीसी । ज्ञानदेव अभंग आळंदीसी || ३ ||


अभंग ६ 

तोची नेम उछव ज्ञानराया । यात्रा मंगळ जन तरावया || १ ||

देशोदेशीचे संत धांव घेती । टाळ वीणे सहीत नाचताती || २ ||

तुकाविप्र उष्ठव आळंदीचा । रंग आभंग नाम कीर्तनाचा || ३ ||


अभंग ७ 

वासी इंद्रायेणी तीर । देव ज्ञान आवतार  || १ ||

पुर आळंदी प्रसिद्ध । संत वसावया शुद्ध || २ ||

मांदी संतांची मिळाली | इंद्रायणी घणाणली || ३ ||

तुकाविप्र मंडपात । नाचे प्रीती सभे संत || ४ ||


अभंग ८ 

धन्य दिवस सोन्याचा | समारंभ आळंदीचा || १ ||

संत समुदाये भला । जेथे आपार मिळाला || २ ||

घोश श्री हरी विठ्ठले  | करीती हे संत भले || ३ ||

तुकाविप्र म्हणे धन्य | संत रूपे देव ज्ञान || ४ ||


अभंग ९ 

ज्ञानराजया विनंती तुम्हा । दाखवा प्रीती पाउले आम्हा || १ ||

हेत फार हा सुचेना प्रीती । देव हे तुम्हा ज्ञान विनंती || २ ||

आवडी तुम्ही न्याल उछवा । फारची वाटे सुख या जीवा || ३ ||

मानसी तुकाविप्र हेत हा । जी आता कृपा दृष्टीने पाहा || ४ ||


अभंग १० 

कीर्तनी उभे तुमच्या पुढे । आवडी आसो केलीसी मुढे || १ ||

यावरी तुम्हा आवडे करा । पाये दाखवा सत्य पामरा || २ ||

हेची विनंती वेळ जाणुनी । सत्य श्रीहरी नाम कीर्तनी || ३ ||

दीन हा तुकाविप्र मानवी । ज्ञानराज या सत्य विनवी || ४ ||


अभंग ११ 

हेत पुरवीला पाहीजे कृपाळा । श्रीविष्णू निर्मळा ज्ञान देवा || १ ||

समये उचीत विनंती हे खरी । परीसावी वरी गोष्टी आहे || २ || 

तुकाविप्र ज्ञानदेवा पाई हेत । सभा मंडपात नाचावे हा || ३ ||


अभंग १२ 

कनक तरूचे तळवटी कथा । संगी ज्ञाननाथा नाचवावे || १ ||

ऐशा हेते प्रीती विनंती कीर्तनी । दशमी सुदीनी लीहीते हे || २ || 

तुकाविप्र नाचे सभा मंडपात । कीजे तोची आर्थ ज्ञानदेवा || ३ ||


अभंग १३ 

संन्यासाचे पोटी विष्णु अवतार। देव ज्ञानेश्वर गीता अर्थ कराया || १ ||

तपोनिधी बाप समर्थ संन्यासी । सद्गुरु आज्ञेसी निरुपम वीरक्त || २ ||

विधीयुक्त ब्रह्म-चर्य आचरले। संन्यासी जाहाले काशीमध्ये जावोनी || ३ ||

तुकाविप्र म्हणे अवतार देव । जाहाले स्वभावे तयाचिया उदरी || ४ ||


अभंग १४ 

येजुर्वेद शाखा | माध्यांजन द्वीज । गोविंद सहज । तपोनीधी प्रेमळ || १ ||

नीराबाई माता | पवित्र सुंदरी । तयेचे उदरी । विठ्ठल हे जन्मले || २ ||

सर्व तीर्थे केली | उत्तर मानस । दक्षण मानस । करावया निघाले || ३ ||

विठोबा हा पुत्र | येकुलता येक । समर्थ भावीक । वितरागी प्रेमळ || ४ ||

तुकाविप्र म्हणे | आळंदीसी आले । देऊळी राहीले । सिद्धेश्वर देवाचे || ५ ||


अभंग १५ 

सिद्धोपंत कुलकर्णी आळंदीचे भक्त सिद्धोबाचे एकनिष्ठ भावार्थी || १ ||

कन्या येकुलती येक उपवर | पडीला विचार सिद्धोपंता वराचा || २ ||

तेव्हा सिद्धेश्वरे स्वप्न सांगितले | थापटोणी केले जागे सिद्धोपंतासी  || ३ ||

वर आला आहे देवूळी तयाला | द्यावे या मुलीला आहे बहु उत्तम  || ४ ||

तुकाविप्र म्हणे जागे सिद्धोपंत | होवोनी धावत  देवळासी पातले || ५ ||


अभंग १६ 

गोविंद नीराई विठ्ठल या तिघा | भेटी पांडुरंगा स्वप्नामाजी जाहाली || १ ||

सांगितले देवे तिघासही स्वप्न | विठोबाचे लग्न येथे होत आहे की || २ ||

तिघेही उठोनी बैसली  चिंतनी  | रखुमाई देवी धन्ये | वधूवर विठ्ठल || ३ ||

आंपूर्व सोहळा विठ्ठल रुक्माइ | जाहाला सर्व ही | लग्न प्रीती आळंदी || ४ ||

तुकाविप्र म्हणे इंद्रायणी तिरी | रुक्मा देवी खरी | ठेवोनी निघाले || ५ ||


अभंग १७ 

सिद्धोपंती स्वप्न सांगितले तया | गोविंद योगीया नीराबाई विठ्ठल || १ ||

मान्य केले स्वप्न आपुले ही त्यांसी | घटीत छत्तीसी उतरले अपूर्व || २ ||

लग्न लावीयेले बहुत प्रीतीने | आशिर वचने दिधले देवे देवे || ३ ||

तुकाविप्र म्हणे चिंतनी देखिला | प्रसंग हा भला गोविंद पंत यांनी || ४ ||


अभंग १८ 

रुक्माइ ठेवीली सिदोपंता पासी | क्षेत्र आळंदीसी | पूढीलीया संधाने || १ ||

दक्षण मानस कराया निघाले | बारा वर्षे गेले | तीकडेची तीर्थासी || २ ||

उत्तर दक्षण त्रिवार साधीली | तीर्थे सांगितली तैसी तैसी पुराणी || ३ ||

कासी वास केला माता पिता शांत | जाहलिया संत येकलाची विठोबा || ४ || 

तुकाविप्र म्हणे संन्यास घेतला | उत्तम साधला योग ऐसा अभंग || ५ ||


अभंग १९ 

स्वप्नी जे देखीले चिंतनी पाहीले | अनुभवी आले कथा सूत्र देवाचे || १ ||

गोविंद निराई विचार तंद्रीत | आले सिद्धोपंत नमस्कार जाहला || २ ||

विचारले तुम्ही कोण कोठे जाता | देश ही कोणता कोण ग्राम वृत्तीचे || ३ ||

तुकाविप्र म्हणे वृत्ती आपेगांव | गौतमी स्वभावे तीर पुण्य भूमीसी || ४ ||


अभंग २० 

एकमेका स्वप्ने निवेदन केली | लग्न लावीयेले विठोबा रुखमाईचे || १ ||

स्वप्नी साक्षात्कार जाला गोवींदासी |  घडीयेले तैसे देवजीच्या सत्तेने || २ ||

दक्षिण मानस करोंनीया तीर्थे | पातले भावार्थे काशीपूर या क्षेत्री || ३ ||

माता पितरासी देवाज्ञा जाहाली | वैकुंठासी गेली उभय माता पीता || ४ ||

वर्णाश्रम विधी सर्व उरकला | संन्यास घेतला विरागी विठोबाने || ५ ||

तुकाविप्र म्हणे देव सत्ता भली | कळो कोणा आली माया मोह जगती || ६ ||


अभंग २१ 

अपूर्वची वैराग्य साधीयेले | गुरुसेवेसी चित्त लावीयेले || १ ||

जाले आपार पुण्ये निरुपम | विधीपूर्वक चालविले नेम || २ ||

ऐसी पुण्ये केलीच त्रिभुवना | माजी मंगळ सकल ही जना || ३ ||

हारीहर विधी सहेत  राजा | ऐसीयाच्या यावेची उदराला || ४ ||

मूळ मायेसहित चौघेजण | देव घेणार जनम परी पूर्ण || ५ ||

तुकाविप्र तो हेत घडतीया | पोटी जन्म प्रमाण संन्यासीया || ६ ||


अभंग २२ 

रुक्मादेवी ठेवोनी आळंदीसी | गेली तिघेही तीर्थ करायासी || १ ||

निरूबाई विठोबा गोविंद हे | घेवोनीया संन्यास बैसले हे || २ ||

तप समर्थ उदयासी आले | रुक्मादेवीने पुण्ये बहु केले || ३ ||

इंद्रायणीचे स्नान उष:काळी | शुभ्र पातळ शुभ्रदिव्य चोळी || ४ ||

कुंकू भाळी मंगळसूत्र गळा | देव पुजिती सिद्धराज भोळा || ५ ||

तुकाविप्र सहज प्रसन्नता | ज्ञानदेवाची मूळ खरी कथा || ६ ||


अभंग २३ 

तप आले समर्थ रुक्माईचे | अवतार पोटासी यावयाचे || १ ||

उभयताचे तप  समतीसी | आले चारी देव ही जन्मयासी || २ ||

तुकाविप्र तेव्हाच उभयंता | रुक्मादेवी विठ्ठल माता पीता || ३ ||


अभंग २४ 

रुक्मादेवीचीया तपे | विठो आणीला प्रतापे || १ ||

गुरु शिष्य समुदाये | आले क्षेत्र आळंदीये || २ ||

सिद्धेश्वरा पासी आले सिद्धोपंत ची भेटले || ३ ||

सिद्धेश्वरा पासी आले सिद्धोपंत ची भेटले || ४ ||


अभंग २५ 

तीन शत संन्यासीया | पुडी आलो सांगोनीया || १ ||

सिद्धोपंत म्हणे गीरी | धन्य दैव गती खरी || २ ||

समुदाये ऐसा आजी | घडत आहे सहजी || ३ ||

तुकाविप्र म्हणे भली | बरे गीर्जाई बोलीली || ४ ||


अभंग २६ 

रुक्मादेवी आनंदली | संत सेवेसी लागली || १ ||

सर्वी दिला आशीर्वाद | तीन शत संत वृंद || २ ||

त्रिभुवना मान्य पुत्र | वती होशील पवित्र || ३ ||

तुकाविप्र भक्ति बळे | रुक्मादेवी पुत्र फळे || ४ ||


अभंग २७ 

संत समुदाय भला | सत्य सूप्रसन्न झाला || १ ||

रुक्मादेवी पाय धुती | संत निष्काम विभूति || २ ||

तीन शताचे धुतले | पाय विठोबा देखीले || ३ ||

तुकाविप्र म्हणे तेंव्हा | वर आला अनुभवा || ४ ||


अभंग २८ 

विठोबाने ग्राम घर | वोळखीला सिद्धेश्वर || १ ||

इंद्रायेणी वोळखीली | कांता रुक्माइ आपुली || २ ||

प्रथमता सिद्धोपंत | सासू गिर्जाई विख्यात || ३ ||

तुकाविप्र म्हणे पुण्ये | रुक्मादेवीचे हे धन्ये || ४ ||


अभंग २९ 

त्रयोदसी दिवाळीची | पूजा संन्यास धर्माची || १ ||

ऐसी पुडी केली प्रीती | संन्यासीया तीन शती || २ ||

सिद्धोपंती राहाविले | चतुर्दसी नहाणीले || ३ ||

एकटीया रुक्मीणीने | तुकाविप्र म्हणे धन्ये || ४ ||


अभंग ३० 

तीनशता मर्दीयेले | प्रीती रुक्माइने  तेले || १ ||

न्याहाळीले भक्तिभावे | संत संन्यासी हे सर्वे || २ ||

सिदोपंतासी  म्हणती | कोठे रुक्माइचा पती || ३ ||

तुकाविप्र म्हणे सत्य | वृत्त सांगे सिदोपंत || ४ ||


अभंग ३१ 

पंत बोलती  स्वामी राजया | संतगुरु सागरा दया || १ ||

तीर्थवासीया दिधली आधी | दैव येकली येक त्या मधी || २ ||

प्रेमळा दिली भावीक भल्या | यात्रीया प्रीती सत्य आपुल्या || ३ ||

बहिण ती निरू सत्य आमुची | सद्गुरू कृपा संत जातीची || ४ ||

तिचीया प्रीती मूळ  दिधली | वृत्तीवंत हे कोठीली || ५ ||

गौतमी तिरी आप या पुरी | भेट जाहाली भीमरा तीरी || ६ ||

त्यावरी तुकाविप्र पुढती | भेटी जाहाली दैव संगती || ७ ||


अभंग ३२ 

दैव हे गती भेटता तुम्ही | मुख पावलो दर्शनेची राहिले || १ ||

तीर्थ फिरता देवूळा आले | त्या दिनी प्रीती वस्ती राहिले || २ ||

स्वप्न दाविले सिद्ध ईश्वरे | या रीती आले घडत हे बरे || ३ ||

मास आकरा या घरी प्रीती | कार्तिकी आली त्याज पुढती || ४ ||

तीन मूर्ती ही सिद्ध जाहल्या | आवडी आम्ही वाटी लावील्या || ५ ||

मास त्याजला एकसे तीस | जाहाले तुकाविप्र हे दिस || ६ ||


अभंग ३३ 

पंत गोविंद सासुरी या नाम | सासू नीराई  संत निरुपम || १ ||

वर विठ्ठल गौर वर्ण ऐसे | अती प्रिये तुम्हासी सिष्य जैसे || २ ||

मुखवटा तो याची रीती आहे | ऐकियेला संन्यास घेतला हे || ३ ||

निरुबाई गोविंद उरकली | वृत्ती विरक्त आनयासे जाली || ४ ||

केला संन्यास ग्रहण ही निका | वय नव्हे आणीक ही ऐका || ५ ||

सिदोपंत स्वामीस वृत्त सांगे | तुकाविप्र याहूनी जाले मागे || ६ ||


अभंग ३४ 

संन्यास घेतला विठोबाने  जेव्हा | रुक्माइचे तेंव्हा | जीणे व्यर्थ  जाहाले || १ || 

देणारा घेणारा | दुशण  सांगती | काये फळ प्राप्ती | संन्यासीया  आयुक्त || २ ||

आसिर्वाद स्वामी | या वरी जाहाला | तीन पुत्र तुजला |  एक कन्या होईल || ३ ||

ऐसी वाणी स्वामी | वदली असता | घडिया घटिता | तुकाविप्र येईल || ४ ||


अभंग ३५ 

स्वामी बोलती पंत हो भले | शास्त्रही तुम्ही सर्व पाहीले || १ ||

सर्व पावलो खूण या मनी | गेलीसे खरी गोष्ट होवोनी || २ ||

सावरा आता शास्त्र संमती | सत्य गोष्टी हे स्वामी बोलती || ३ ||

शास्त्रता तुकाविप्र जे निटी | वाट काढली वेद चोखटी || ४ ||


अभंग ३६ 

सर्व स्वामीने ग्रंथ पाहीले | त्यावरी गणसूत्र बांधीयेले || १ ||

चार बालके होत जोवरी | तोवरी विठो रहा या घरी || २ ||

सत्य वाणी हे तुझीच हाते | होतसे विठो शास्त्र किमते || ३ ||

मान्य केल्यावीण ना गती | तीन उदरी देव जन्मती || ४ ||

| सहस्त्र ही तुकाविप्र जाहाला || ५ ||


अभंग ३७ 

गर्भ राहीला प्रथम दिवसी | नव ही जाले मास त्याजसी || १ ||

पुत्र निवृत्ती नाथ जन्मले | तीन त्याजला मास जाहाले || २ ||

ज्ञान त्याजवरी पुत्र दुसरा | गर्भ विष्णु श्री राहीला खरा || ३ ||

मास त्या नव ज्ञान जन्मला | तीन जाहाले मास त्याजला || ४ ||

राहिला विधी गर्भ त्यावरी | व्याप हा क्षिति सर्व जो करी || ५ ||

पुत्र तीन त्रिगुण चांगले | आवडी तुकाविप्र जन्मले || ६ ||


अभंग ३८ 

सोपान जन्मल्या वरी तीन मास | गर्भ पहा कैसा आदिमाया राहिला || १ ||

नव मासावरी मुक्ताई जन्मली | चित्कळा शोभली नात सिद्धोपंतासी || २ ||

कन्या रत्न होता रुक्माई देवीसी | जाल्या तीन मासी उभयेता निघाली || ३ ||

विठोबा रुक्मिणी महा यात्रा केली | बाळे हे ठेवीली आजा आजी जवळी || ४ ||

तुकाविप्र म्हणे मनकर्णिकेत | उभयेता गुप्त जाली जळा भीतरी || ५ ||


अभंग ३९ 

आठेताळ मास आळंदी भीतरी | सिद्धोपंता घरी राहीले की विठोबा || १ || 

तीन वर्षे तीन मास निवृत्तीसी | ज्ञान राज यासी वर्षे सव्वा दोनची || २ ||

एक वर्ष तीन महीने सोपाना | मुक्ताई निधाना तीन मास तेधवा || ३ ||

तुकाविप्र म्हणे त्यापुढे पुढती | चहु बाळे  ख्याती केली कली युगात || ४ ||


अभंग ४० 

अवतार तिन्ही विधी हरिहर । निवृत्ती शंकर ज्ञानदेव श्रीविष्णु || १ ||

ब्रह्मदेव पुत्र धाकुटा सोपान । मुक्ताई निधान आदिमाया मूळची || २ || 

तुकाविप्र म्हणे सिद्धेश्वर गीरी। कृपाफळे खरी नीरुबाई गोविंद || ३ ||


अभंग ४१ 

वहीच्या सेवटी आळंदीचा काला | कृष्ण कार्तिकीला त्रयोदसी विख्यात || १ ||

प्लव संवत्सर शक शालिवान | सत्रा शत तीन कुमंडली तीरी या || २ ||

सिद्धराज पिठी वनी या आनंद | कलीयुग शुद्ध प्रथम हा चरण || ३ ||

आठे ताळ शत एक्याऐंशी प्रमाण | कीर्तन रंगण यात्रा नेम आळंदी || ४ ||

श्रोते वक्ते ज्ञानेश्वर होवोनीया | गोष्टी लिहिल्या या सहज श्री कीर्तनी || ५ ||

तुकाविप्र ज्ञान राजी या अंकित | संत सभे आत वाणी सत्य वदली || ६ ||


 

 

Scroll to Top