गाथा पारायण अभंग

गाथा पारायण अभंग 


धुंडिराजा करु | प्रथम वंदन | दुसरे वंदन | गुरुराया || १ ||

दत्तात्रेया तुम्हा | साष्टांग नमन । तुकाविप्र लीन | सर्व भावे || २  ||


प्रसन्न वदना वेदांत सिद्धांता । वरदान आता तुर्त द्यावे || १  || 

हेता ऐसे तुज पूजावे अभंग | भरोनी सर्वांग प्रेम प्रीती || २  ||

पूर्ण हेत तेव्हा पूजन ही घडे । विनंती निवाडे खरीखूरी || ३  ||

तुकाविप्र म्हणे राजयोग नीती। भाव प्रेमा भक्ती सिद्ध व्हावी || ४ ||


गुरुदेवा विप्रनाथा । मज होय बुद्धीदाता || १  ||

केली प्रथम चरणी। गुरुराया विनवणी || २ ||

मति द्यावी जी सबळ । गुरुराज या निर्मळ || ३ ||

 तुकाविप्र म्हणे देवा ।। गुरुकृपा वर व्हावा || ४ ||


अवचट नोहे नेमे आलो जन्मा । कीर्तन महिमा कलीमाजी म्हणोनि || १ ||

आर्व आहे आम्हा शंभर कोटीचे । खर्व या नामाचे संकीर्तन आमुचे || २  ||

कलयुगासाठी, जन्माची आवडी । पद्म शतकोडी आर्व आम्हा कीर्तन || ३  ||

देव नाम याची सर्व कथा वार्ता । श्रोता गुरु वक्ता संकीर्तन अभंग || ४  ||

तुकाविप्र कली आर्व तेचि भागा ।। कीर्तन चिद्गंगा संत गुरु संगती || ५ ||


मागु नये काही | देवाही दिकाला । उदर पूर्तिला | कोणे काळी || १ ||

फिरवावी झोळी | करावा आनंद । देवासी नैवेद्य | सर्वाभूति || २ ||

गुंतू नये कोठे | इनामा वार्षिका । प्रेमळ भाविका | सूचना हे || ३ ||

तुकाविप्र एका | झोळीच्या आधारे । कीर्तन गजरे | सर्व काळ || ५ ||


आम्ही गर्जत हरी नाम आलो | सुखरूप सहज आता जालो || १ ||

प्रचिती हे प्रमाण सुचविली | चित्त असावे ते बाप विठ्ठली || २ ||

ज्ञान गर्व सांडोनी हरी गावा | सत्य लाभ तरीच नीत्य नवा || ३ ||

सूचना हे प्रचीत जाणोनिया | नासो आळस हरी नाम गाया || ४ ||

तुकाविप्र आवडी हरी नाम | कलयुगी साधन निरुपम || ५ ||


इष्ट नव्हे निष्ठ ऐसे | गुप्त नसे प्रगट || १ ||

सर्व  काळ दिसे परी | रुप हरि नाकळे || २ ||

भाव अभाव भावना | संकीर्तनी गुंतली || ३ ||

तुकाविप्र म्हणे वस्तु | पटी तंतु कापूस || ४ ||


उपकारी संतराव । ज्याचा  आज्ञाधारी देव || १ ||

त्यानी धरियेले हाती | दाखविला रमापति || २ ||

केले उभे कीर्तनासी । हरि विठ्ठल प्रीतीसी || ३ ||

तुकाविप्र म्हणे देव । सर्वभावे संतराव || ४ ||


उदाराचा राणा हरी। भीमा तीरी तु यक || १ ||

वीटेवरी उभा धींग । पांडुरंग तु देवा || २ ||

हेची पाई झळाळीत । माळा संत बिरूद || ३ ||

 तुकाविप्र तुझे भेटी  । ब्रीदासाठी कीर्तनी || ४ ||


१०

एकनाथ कृपे आनंत वैष्णव ।  नामी नित्योछव । हरी गुरू प्रसाद   || १ ||      

एकनीष्ट तप सह्याद्रीचे तळी । कृष्णेचीया जळी । वेदवती संगम || २ ||

तुकाविप्र तया कुळीचा प्रसाद । कीर्तन आनंद । हरी गुरू स्मरण || ३ ||


११

ऐकारे बाप हो | करू नका गूल | स्मरणी विठ्ठल | प्रीती करा || १ ||

इतर भाषण | तारीना तुम्हासी | न करा वाचेशी | उगा शीण || २ ||

क्षण भर तरी | स्मरण करावे | शुद्ध भक्ति भावे | श्री हरीचे || ३ ||

ऐसे वेद श्रुती | शास्त्राचे प्रमाण | श्री हरी स्मरण | सार आहे || ४ ||

तुकाविप्र म्हणे | ऐकावे आवडी  | कीर्तन हे जोडी  सार एक || ५ ||


१२

ऐसे किती याची मऱ्हाष्ट्र देशात | विठोबाचे भक्त निरुपम || १ ||

देशो देशी भक्त अनंत अपार | विठ्ठल साचार देवाचे या || २ ||

तुकाराम वाणी कुणबी जातीचा | भक्त विठोबाचा निरुपम || ३ ||

कान्होबा तयाचा बंधु कीर्तीध्वज | पुत्र  भक्तराज  नारायेण || ४ ||

तुकाविप्र म्हणे नातू पंतु त्यांचे | भक्त विठोबाचे कुटुंबीत || ५ ||


१३

कीती जपाल धनाला । काही जपा की हीताला || १ ||

येक येकासी पाहता । धन जोडीसी करीता || २ || 

त्याच्या गती जाणोनीया । लागा हीता आपुलीया || ३ ||

तुकाविप्र म्हणे धन । आहे धर्म तो करणे || ४ ||


१४

खेळ टीपरी आनंद । हा गोविंद विजेई || १ ||

नाच तडातड हारी । या टीपरी खेळता || २ ||

न जा कोठे येथोनिया । सीणवाया सकळ || ३ || 

देव खेळाया गूंतला । संत भला संगती || ४ || 

तुकाविप्र नित्यावळी । देव खेळी आभंग || ५ ||


१५

खळा रोकडे पाझर । ते हे सत्य पंढरपुर || १ ||

येथे खळत्व राहणे । हेचि पाप दुजे कोणे  || २ ||

पुण्येवंता तुर्त लाभ । संत संगती स्वयंभ || ३ ||

कासे गोचीड लागला । दूध चवी काये त्याला || ४||

तुकावीप्र पंढरीसी । तैसा काये पापरासी || ५ ||


१६

गुरूस्वामी दत्तात्रेय । आम्हा देह दाविले || १ || 

देह धरावसे जाले । तेंव्हा केले कौतुक || २ ||

वेडी देहासी निंदिती । तोंडी माती तयाच्या || ३ || 

देह बोलाचे भांडार । सर्व सार देहचि || ४ ||

तुकाविप्र देह दृष्टी । सत्य गोष्टी अभंग || ५ ||


१७

गोडी लागलियावरी । सुटे कैसी तया वारी || १ || 

संत संगे लागे गोडी । तेंव्हा होये सार जोडी || २ || 

ऐसा लाभ हाता येणे | सत्य सद्गुरूचे देणे || ३ || 

थोर विश्वास या काजा | त्रिभुवनी कीर्तिध्वजा || ४ || 

तुकाविप्र म्हणे भोळी । भक्ती लाभची सगळी || ५ || 


१८

घराश्रमी केली | उत्तम रहाटी। धरीयेले कटी  | नाम हरी || १ || 

त्याने केले ऐसे | काही कवतुक । पिकविले सुख | कीर्तनाचे || २ || 

विप्र पदवीचा | देणे भोगवटा । म्हणोनि वैकुंठा | नेले मज || ३ || 

तुकाविप्र लिखा | दऊत लेखणी । विठ्ठल स्मरणी | कृष्णातीरी || ४ ||


१९

घरे मोटाली बांधीली । भाग्ये अपार भोगीली || १ || 

सत्ता मिरवली जगी । मरोनिया गेली उगी || २ || 

उरविली नाही कीर्ती । संती सांगावया प्रीती || ३ ||  

व्यर्थ सीण केला खरा । नर जिण्याचा मातेरा || ४ || 

हरी गुरू भक्ती करा । मग कीर्ती कैची काई || ५ ||   

तुकाविप्र म्हणे संत । सभे कीर्ती तोची संत || ६ || 


२०

चला विठल दर्शना। चंद्रभागेचीया स्नाना || १ || 

काला खेळाया पंढरी । देवराया बरोबरी || २ || 

चला भाविक प्रेमळ । खेळू पंढरी सकळ || ३ || 

तुकाविप्र म्हणे तूर्त । चाला धरोनि भावार्थ || ४ || 


२१

चंद्रभागे पुंडलीका । भावे नमस्कार येका || १ || 

प्रिती बहु असो डोळे । भेटी अभंग सोहळे || २ || 

नित्य आता संध्या स्नान | चंद्रभागे ब्रह्म यज्ञ || ३ ||  

सर्व भावे ब्रह्म कर्म । भूमी वैकुंठी हा नेम || ४ || 

तुकाविप्र विनवणी । सत्य जोडोनिया पाणी || ५ || 


२२

छैया मय्या पैठणात । जाले गंधर्व कलीत || १ || 

एकनाथाचे वंशज । मोठे साधु कीर्तीध्वज || २ || 

निरुपम देखियेले । प्रतिष्ठानी तूर्त काळे || ३ || 

तुकाविप्र संतोषला । तया पाहोनी संताला || ४ || 


२३

जीव दशा सर्व नाहीसीच केली । आळी भृंगी जाली जैसी तैसी || १ || 

तनु मात्र आहे दीसाया मानव । गुरुकृपा ठेवा भक्तीसाटी || २ ||  

तुकाविप्र म्हणे देहीच वेगळा |आभंग आगळा ब्रह्म लाभ || ३ || 


२४

जयासी न घडे पंढरीची वारी। जावे ब्रह्मपुरी एकवेळ || १ || 

मार्गशिर्ष मासी होतो हा उत्सव । जमताती देव सकळीक || २ ||

अमातिथी पर्व कृष्ण खेळे काला । वाटे भूदेवाला स्वानंदाने || ३ || 

तुकाविप्र म्हणे सत्य अनुभव । साधु संत सर्व घेती तेथे || ४ ||


२५

त्वरीत मागणे मागतो प्रीती । लाज काय ते साच श्रीपती || १ || 

सर्व साक्षीया सर्व देखण्या | दे कृपानिधी नाम ते घेण्या || २ ||  

मागणे दुजे आमचे  नसे । ठाऊके तुम्हा सर्वही आसे || ३ ||  

विनवि तुकाविप्र धोंगडी । घाली कीर्तनी श्री हरी उडी || ४ || 


२६

तप सायास न लगे । देव उभा कथा रंगे || १ ||

सोपा जाला कलीमाजी । उभा कीर्तनी सहजी || २ || 

बहु तपे न लगती । कथा रंगी भेटी होती || ३ || 

तुकाविप्र म्हणे हरी । सत्य कीर्तन गजरी || ४ ||


२७

थेंब बहुत मेघाचे | परि एका पाणीयाचे || १ ||

फळे वृक्षासी अनेक | सर्वामध्ये बीज येक || २ ||

साखरेचे बहू कण | गोडी सर्व एक पणे || ३ ||

तैसे जग बहू परी | एक आत्मा सत्य हरी || ४ ||

तुकाविप्र म्हणे जाणा | ऐशा वेदांतीच्या खुणा || ५ ||


२८

थोडकीया  श्रमे फार लाभ आम्हा  जाला | नाम गर्जताची देव सत्य जगी आला || १ ||

बोध्य आवतार स्वरूपाचे नीजध्यानी | सावधान होये नित्य नाम संकीर्तनी || २ ||

तुकाविप्र दैव  भले देव कथे भेटी | सत्य गुरु नित्यनेमे कृपा कर कटी || ३ ||


२९

देव नाही भक्त नाही | संत साधू  सिद्ध नाही || १ ||

ऐसे कल्पी ज्यांचे मन | नव्हे आत्म त्या दर्शन || २ || 

ज्याचे मुखी सर्व नास्ति | तया नव्हे आत्म प्राप्ती || ३ ||

नाही असे जे म्हणती | तया जाणे अधोगती || ४ ||

तुकाविप्र म्हणे आहे | देव जेथे तेथे देहे || ५ ||


३०

देव पाहतो ऐकतो | देव बोलतो चालतो || १ ||

देव करितो सर्व ही | व्याप बैसोनिया देही || २ ||

भले मुर्खाचे राव | नाही म्हणताती देव || ३ ||

ब्रह्मा उत्पत्तीचे अंग | विष्णु प्रतिपाळी जग || ४ ||

शिव करितो संहार | ऐसा चालतो व्यापार || ५ ||

तुकाविप्र म्हणे काय | नाही सकळची आहे || ६ ||


३१

देवाजीच्या दासा चिंता | भय तरी काय आता || १ ||

भय नाही चिंता आंस | सर्व विषयी उदास || २ ||

ऐसे जातिवंत भोळे | दास देवाचे आगळे || ३ ||

सर्व काळ सुख रूप | ब्रीद भूषण प्रताप  || ४ ||

तुकाविप्र देव भक्त | भय चिंते  विरहित || ५ ||


३२

देव भक्त उभयेता । श्रोता वक्ता जाहाले || १ ||

उभेयता प्रीतीमुळे । हे सोहळे कथेचे || २ || 

भाव भक्ती बळे कथा । उभी सत्ता श्रीहरि || ३ ||

 तुकाविप्र देव भक्ती । कथा युक्ती हरिची || ४ ||


३३

दिन उगवे तो आम्हा । हरी नामा संगती || १ ||

ऐसी देणे जयालागी । ते या जगी सांगाती || २ |||

नामी आवडी आसावी । नीत्य नवी आभंग || ३ || 

विनवणी सकळीका | हे भावीका भोळीया || ४ ||

तुकाविप्र म्हणे हेत । नामी सत्य धरा की || ५ ||


३४

धर्म वासना सर्व सांडली  | जोडुनी धने पुरूनी ठेवीली || १ ||

जतन राहीली काळ चालीता  । धन्ये मी म्हणे येक जोडता  || २ ||

काळ फीरता पाडीली घरे । द्रव्य काढीले सर्व ही खरे || ३ ||

तेधवा रडे चुकलो खरा । नुमजे तुकाविप्र या नरा || ४ ||


३५

धन्य कीर्तन प्रसंग । संत संग कलीत || १ || 

सार प्रसंग प्रारब्धा । आजी वेदा श्रुतीचा || २ ||

नाम विठ्ठल कीर्तन । धन्य ध्यान उघडे || ३ ||

श्रोता वक्ता दोनी भाग । येक अंग लाभासी || ४ ||

 तुकाविप्र म्हणे येक । नाम सुख विठ्ठल || ५ ||


३६

नभ नसे कोणे ठायी । ब्रह्म हें ही ऐसेची || १ ||

सर्व नभाचिया पोटी । नव्हे तुटी सहसा || २ ||

येकामाजी येक प्रीती | । ऐसी क्षिती अभंग || ३ ||

तुकाविप्र म्हणे नभ । हे स्वयंभ सर्वत्री || ४ ||


३७

नाम गर्जना करीत । हारे वेथा भवाची || १ ||

ऐसे साधन सुगम । हारी नाम कलीत || २ ||

सर्व प्रकारे साधन । नाम धन्ये हारीचे || ३ || 

जाण आत्मनी  जाहाले । ते लागले भजेना || ४ ||

तुकाविप्र म्हणे सार । कथा थोर हारीची || ५ ||


३८

नारायेण आदी कृपे आत्रीनाथ। सुकृते समर्थे । आनसूये सतीची  || १ ||

तीनी देव येक रूपे जये पोटी । आंनतशा कोटी । सुक्रुताच्या आभंग  || २ ||

तुकाविप्र तथा प्रसादे कलीत । कीर्तनी वनात । घनानंद विठ्ठल  || ३ ||


३९

नाम विठल आगळे । तारू त्रिजगा सगळे || १ ||

ऐसे दिसेना दुसरे । जड जीवा तारू खरे || २ ||

हरी विठल हा मंत्र । सर्वा पावन पवित्र || ३ ||

नेघे तो एक नाडला । जेन्मा नाही तैसा आला || ४ ||

तुकाविप्र म्हणे हरी । वदो विठल वैखरी || ५ ||


४०

टीपरी खेळता विठल आठवा । आभंग लावा ध्वजा की || १ ||

 नमन तुमच्या चेरण कमळा | टीपरी बाळा कृष्णाची || २ ||

वेदांत जाणते टिपरी खेळू या । स्वयंभ उदया नाम धींग || ३ ||

प्रमाण तुकीया विप्र प्रसादे  ।   नाचतो छेंदे आभंग || ४ ||


४१

डोळे भेटी जाली हरी । कटी कर वीटेवरी || १ ||

रूप सावळे गोजीरे । डोळा साठवले बरे || २ ||

सीरी मुगूट झळाळी । उभा साजे वनमाळी || ३||

रत्नजडीत पदक । शोभा प्रकार अनेक || ४ ||

मूक्त चौकडीया कानी । हीरे लागले नयेनी || ५ ||

शोभीवंत उभे ध्यान । मन वेधले पाहून || ६ ||

तुकाविप्र डोळे भेटी । विटेवरी जगजेठी || ७ ||


४२

डोळे भेटीसी तुटी नसो देवा | विनवणी विठ्ठल वासुदेवा || १ || 

अखंडीत समोर सर्व काजा । करावे सत्य महाराजा || २ ||

पळभरी वियोग पूरवेना | मायबापा विठ्ठल दयाघना || ३ || 

तुकाविप्र आवडी उरुबुरू | प्रिती नाचावे सत्य जगद्गुरू || ४ ||


४३

पटी कापुस आसता । नाही वार्ता तयासी || १ ||

नाना नामे जाले पट। नाही खोट कापुसा || २ ||

कोणी म्हणेना कापूस । पट त्यास बोलती || ३ ||

तुकाविप्र म्हणे तैसा  । जन ठसा ब्रह्मीचा || ४ ||


४४

पाश लपविले यमे । ऐसे झाले हरीनामे || १ || 

यम सामोरा पातला । नर नाम धारकाला || २ ||

केला आदर बहुत । जोडोनिया दोन्ही हात || ३ ||

नाम पराक्रम ऐसा । भोळा भाव धरा कैसा || ४ || 

तुकाविप्र म्हणे यम । तोचि झाला सत्य धर्म || ५ ||


४५

प्रथम कलीत नामदेवा ऐसा | उद्धरिला कैसा कुटुंबेसी || १ || 

दामासेटी बाप गोणाबाई माता | सणकादी भक्ता ऐसे केले || २ || 

उपमन्ये ध्रूव प्रल्हादा समान | बाळा दिला मान नामयाचा || ३ || 

तुकाविप्र म्हणे ऐसे किती भक्त | विठ्ठले विख्यात उद्धरिले || ४ || 


४६

फार हेत हाचि जाला । तुज पहावे विठ्ठला || १ || 

चंद्रभागेसी नहावे । सभामंडपी नाचावे || २ ||

अन्न सेवावे भिक्षेचे । मधुकरी वेदांतीचे || ३ ||

नाम गांवे तुझे हरी । विठो रंग साळेवरी || ४ ||  

तुकाविप्र हेत फार । डोळे भेटी निरंतर  || ५ || 


४७

बद्रीवनासी यावया । काय कारण तुकीया || १ ||  

पूर्वजन्मी हेत केला । तैसा तूर्त फळा आला || २ || 

विनायकासी पूजावे । हेत केला होता जीवे || ३ || 

तुका विप्र हेत होणे । बद्रीवनी गुरु देणे || ४ || 


४८

बावन वर्णहो भाऊ सांगताती | धरा दृढ चित्ती गुरु चेले || १ ||  

अभिमाने नका लंडिया हो मरु | संत जगद्गुरु मनोहर || २ ||  

श्रोते वक्ते जया कीर्तनी डोलती | ते ठायी श्रीपति नाचता हे || ३ ||  

तुकाविप्र श्रोत्या  वक्त्या मेळी | सापडला बळी कृपे आता || ४ ||  


४९

भक्त देव दोन्हीपणे । आता होणे प्रसन्न  || १ ||

उभयता मिळोनीया । करा दया आभंग  || २ ||

भेद ठेवू नका काही । याची देही सांभाळा  || ३ ||

प्रीती केली देव भक्ता । उभयेता विनंती  || ४ ||

तुकाविप्र म्हणे कृपा । मायेबापा करावी  || ५ ||


५०

भाव जेथे प्रगटला । देव तेथेची बींबला || १ ||

सत्यदेव भावापासी । आम्ही पूसीले वेदासी || २ || 

तुम्ही धरा येक बोले । भाव संतापासी भले || ३ ||

शाहाणेची आहा सर्व । देव तोची खरा भाव || ४ || 

तुकाविप्र म्हणे धरा । संत पायी भाव बरा || ५ ||


५१

भले प्रारब्धाचे गाढे | नामधार ते निधडे || १ ||

माता पिता त्याचे धन्य | नामी रंगले अनन्य || २ ||

कुळ पवित्र तयाचे | नाम विठ्ठल वाचे || ३ ||

पुरा ब्रम्हची तो होये | हरी हरी प्रीती गाये || ४ ||

तुकाविप्र म्हणे नाम | धन्य गाती युक्त प्रेम || ५ ||


५२

भोंदावया तुम्हा नाही । आलो आम्ही विठो द्वारी || १ ||

भावभक्ती पाहो तेही । तुका देही विप्र हो || २||

तुम्हा विप्र वृंदा सर्व । नाम साधन असे आर्व || ३ ||

तुकाविप्र सांडोनि गर्व । प्रीती भाव वाढवावा || ४ ||


५३

मढे प्रत्यक्ष चालवी । तया ऐकवी बोलवी || १ || 

पाणी पेववी मढीया । आन्न सेववी काया || २ ||

नाना दाखवी कौतुक । देव नित्य जवळीक || ३ || 

सर्व देहाचे व्यापार । चालवितो निरंतर || ४ ||

तुकाविप्र म्हणे देही । गुरु कृपे देव पाही || 5 ||


५४

मजपासी आसोनी माझे मन । नव्हे माझीया सत्य आधीन || १ ||

म्हणवोनी तुम्हासी विनविले । मन ऐसे येकाची प्रीती बोले || २ ||

समजवोनी कीर्तनासी लावा । तुकाविप्र मनासी तुम्ही देवा || 3 ||


५५

मना विनंती हे तुज । साधी आत्महीत काज || १ ||

मान सन्मान मागसी । न मिळता दुखवसी || २ ||

नको पाहू मानामान। करी संतांसी नमन || ३ ||

संत अवघी पंढरी । गोष्टी न मिळे दुसरी || ४ ||

तुकाविप्र म्हणे मना। तुज अभंग प्रार्थना || ५||


५६

येका मातीचे जाहाले । घट भले अनंत || १ ||

माती घटाला सुटेना । ब्रह्म जना तैसेची  || २ ||

घट मातीचा घडला  । तो मातीला सोडेना || ३ ||

 तुकाविप्र म्हणे माती | घट प्रीती सुटेना  || ४ ||


५७

येका गुरुकृपे वीण | सर्व सीण सहज || १ ||

म्हणोनीया संपादावी | नित्य नवी कृपा हे || २ ||

हीत जाणावे त्वरित | संग संत कीर्तन || ३ ||

तुकाविप्र म्हणे भला | लाभ जाला कृपेचा || ४ ||


५८

युगायुगीचा हा | नामा भक्त भोळा | उदास मोकळा | ब्रह्मनिष्ठ || १ ||

भक्ता माजी बळी | नामा सर्वगुणे | आगळे करणे | नामयाचे   || २ ||

देवाचा अत्यंत | आवडता नामा | सत्य केली सीमा | नामदेवे || ३ || 

तुकाविप्र म्हणे | नामा मूर्तिमंत | भेटताहे तुर्त | भाविकासी || ४ ||


५९

रूप निघोट सावळे | आले डोळे भरोनी  || १ ||

निवालीयाचे पाझर | कटी कर अभंग   || २ ||

सर्वांगाची डोळे भेटी | पाठी पोटी निघोट  || ३ ||

तुकाविप्र नामरूप | श्री प्रताप सद्गुरू || ४ ||


६०

रमारूक्मीणी सहीत । क्रपावंत हो हरी || १ || 

प्रेमयुक्त वाचे नाम । नित्य नेम धुमाळी ||२ ||

ऐसे कीजे रमापती । श्री विनंती विठोबा || ३ ||

तुकाविप्र म्हणे देणे । सर्वगुणे कीर्तन || ४ ||


६१

रोहिदास आणि | कबीर कमाल । प्रगटा आणिले | नामदेवे || १ ||

नानकादी भक्त | प्रगट व्हावया |  मुख्य हाची पाया | नामदेव  || २ ||

कुर्मदास गोरा | सावता प्रगट । नामदेवे नीट | भक्त केले || ३ ||

तुकाविप्र म्हणे | चोखामेळा बंका । नामदेवे लेका | उद्धरिले || ४ ||


६२

लक्षूमण रामदासी । संत चाफळचा वासी || १ || 

योगी उदार विरक्त । सत्वगुणी क्षमा युक्त || २ ||

भक्ती भावार्थे आगळे । ज्ञानी अंतर निर्मळ || ३ ||

तुर्त पट्ट अधिकारी । लक्षूमण आवतारी  || ४ ||

तुकाविप्र सुखी होणे । होता तयाचे दर्शने || ५ ||


६३

लाभ समर्थ आइता | दैवे आणियेले हाता || १ || 

केले नव्हे तेची काही | संत सभेवर देही || २ || 

सार चहु युगामाजी | नाम कीर्तन सहजी || ३ || 

तुकाविप्र आपुलीया | दैवा पाहुनी सुखीया || ४ || 


६४

विठ्ठल विठ्ठल स्मरण हा नेम | नित्यावळी नाम कथा हरी  || १ ||  

सहज मुकाम कोठेही पडिला | गाजवी आपुला कीर्तिघोश || २ ||

देणे हे मागणे प्रसंगा साजिरे|  विठ्ठल गोजीरे रूप डोळा || ३ || 

सर्वांगी तो प्रेमा आपुले प्रितीचा | काया मन वाचा नेम हाचि || ४ ||

तुकाविप्र म्हणे घडी हे सोन्याची | कीर्तन तुर्तची देखीयेले || ५ ||


६५

वारी जयाचीया कुळी | त्याची लागो पायेधुळी || १ ||  

ऐसे ब्रह्मादी इच्छिती । परी नव्हे तथा प्राप्ती || २ ||

आम्हा मानवासी लाभ । भाग्ये अपार स्वयंभ || ३ ||

गुरुकृपेचा प्रताप | रासी लाभाच्या  अमुप || ४ ||

तुकाविप्र म्हणे भोळा । तया लाभ हा सगळा || ५ ||


६६

विठलाई नाम गाणे | लागो कडेसी हे जीणे || १ || 

हाची नेम सीद्धी जाता । तुझी कृपा रमाकांता || २ || 

आम्हा संपूर्ण पावली । कथा रंगी साच बोली || ३ || 

तुकाविप्र म्हणे ऐसी । कृपा करी विठो कैसी || ४ || 


६७

शुद्ध भावार्थ पदरी । आसलीया देव घरी || १ || 

फार न लगे चावटी । घडी लाभाची हे मोटी || २ ||  

युग बहुत चांगले । जीणे त्याज होनी भले || ३ || 

तुकाविप्र म्हणे वक्ता । भली कथा भला श्रोता || ४ || 


६८

शतकोटी ऐसा  | ग्रंथ केला  सिद्ध  त्रिजगी प्रसिद्ध | नामयाने || १ || 

नामा तुका विप्र | द्रष्ट्रे हे साचार । तिघांचा ओंकार | येक नामा || २ ||

आदि मधी अंती |  सर्वव्यापी नामा | शारदा महिमा | ना शके वर्णु  || ३ ||

तुकाविप्र युग्म |  कृष्णराधा जैसे । विठू नामा तैसे |  शोभीवंत || ४ ||


६९

श्रोते बावन वर्णाचे  | शुद्ध पुतळे प्रेमाचे || १ ||  

प्रेम सर्वांगी आणावे । देवा संगती खेळावे || २ ||

ऐसे जन्माचे प्रमाण । गावे श्री हरीचे गुण || ३ ||

हरी खेळाचे संगती । काला रंगी प्रेम प्रीती || ४ ||

तुकाविप्र म्हणे ऐसी । युक्त भागवती खासी || ५ ||


७०

श्रोता विठ्ठल अभंग | नाम धिंग विठ्ठल || १ || 

वक्ता विठ्ठल श्रीपती | वेद मूर्ती वेदान्त || २ || 

भक्ती विठ्ठल भावार्थ | वेद अर्थ सोलीव || ३ || 

वक्ता श्रोता ही विठ्ठल | समतोल कीर्तनी || ४ || 

तुकाविप्र निमित्यासी | लोकिकासी दावणे || ५ || 


७१

सत्य जाती येक गहूं । परि प्रकारची बहू  || १ ||

तैसा आत्मा येक जनी | जीव चौऱ्यांशी ही योनी  || २ ||

एक जिवनची परी |  बहु तयाच्या लहरी  || ३ ||

तुकाविप्र म्हणे भूती | हरी एक विराजती  || ४ ||


७२

संत कोणीही यातीचा । तो शांतीचा पुतळा || १ ||

भाव भक्ती प्रेमेवीण | संत पण कैचे ते || २ ||

शांती संतपणा मूळ । पूण्येफळ आईते || ३ ||

तुकाविप्र म्हणे जिणे । संतपणे चांगले || ४ ||


७३

सीमग्याचा नव्हे खेळ | ऐका श्रोते सकळ || १ ||

काळ बैसलासे उसा | वर्म हे का नेणतसा || २ ||

हरी वाचे केव्हा यावा | केंव्हा संसार सरावा || ३ ||

सर्वकाळ नासीवंत | गोष्टी होतची आहेत || ४ ||

तुकाविप्र म्हणे हारी | आठवावा क्षणभरी || ५ ||


७४

हेत बहुत जाहला । तुज भेटावे विठ्ठला || १ ||

सभा मंडपी पंढरी । नाचू रंग साळेवरी || २ ||

आस बहुत सुटली । डोई ठेवावी पाऊली || ३ || 

श्रोता वक्ता तुम्ही व्हावे । सभा मंडपासी यावे || ४ ||

तुकाविप्र रंग साळे। वरी नाचवी कृपाळे || ५ ||


७५

हरी हरी दोन अक्षरे गर्जता । आपार  सुकुता जोडी होये || १ ||

श्रीकृष्ण आर्जुना सांगितले स्तोत्र । ॐकाराचा मंत्र मुळ हरी || २ ||

तुकाविप्र म्हणे वेद श्रुती वाणी । कीर्तन रंगणी उभा हरी || ३ ||


७६

ज्ञान कासया कथावे । नाम विठ्ठल गर्जावे || १ ||

हाची विधी या क्षेत्रीचा | काया मन सत्य वाचा || २ ||

नाम गर्जना करावी । हरी गुण कीर्ति गावी || ३ || 

चंद्रभागेसी नहावे । सभा मंडपी नाचावे || ४ ||

तुकाविप्र सार्थकता । डोळा पंढरी पाहता || ५ ||


७७

ज्ञानराजया विनंती तुम्हा । दाखवा प्रीती पाउले आम्हा || १ || 

हेत फार हा सुचेना प्रीती । देव हे तुम्हा ज्ञान विनंती || २ ||

आवडी तुम्ही न्याल उछवा । फारची वाटे सुख या जीवा || १ ||

मानसी तुकाविप्र हेत हा । जी आता कृपा दृष्टीने पाहा || १ ||


 

Scroll to Top