संत तुकाविप्र यांनी आपल्या अभंगात अनेक संतांचा उल्लेख केला आहे . त्यातील काही त्यांचे समकालीन आहेत तर काही पूर्व कालीन आहेत. संत तुकाविप्र आपल्या अभंगातून समकालीन संतांशी झालेल्या भेटीबद्दल , त्यांच्या सत्प्रवृत्तीबद्दल व्यक्त होतात तसेच पूर्वकालीन संतांच्या कार्याचा विठ्ठलभक्तीचा आदर करतात . या भागात ज्या संतांच्या बद्दलचा अभंग आहे त्यांचे नाव / नावे दिलीआहेत आणि त्यानंतर अभंग दिला आहे. अनेक संताची माहिती आज आपल्याकडे नाही पण हे अभंग वाचून त्या त्या संतांची माहिती असणारे लोक पुढे येवू शकतात. त्याच बरोबर हे अभंग संत तुकाविप्र यांच्या समकालीन संतांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक मोठी मेजवानी ठरणार आहे .
- संत आण्णा अनंत उपाध्ये
आण्णा अनंत उपाध्ये । संत पंढरी या मध्ये || १ ||
भोळा भाविक प्रेमळ । सत्य अंतर निर्मळ || २ ||
सत्वसीळ निरुपम । साधु सर्वज्ञ परम || ३ ||
भेटी स्वानंदाची जाली । चित्त वृत्ती संतोषली || ४ ||
प्रीती योग्य संत होये । त्याचे न सोडावे पाय || ५ ||
तुकाविप्र साचे तया । शुद्ध ऐसा विद्यार्थीया || ६ ||
संत एकनाथ
ओम नमो एकनाथा । तव चरणी ठेवी माथा || १ ||
भानुदास कुळीच्या भास्करा । कृपा तुमची विस्तारा || २ ||
तुकाविप्र हाती घरा । भक्ती भावे उभा करा || ३ ||
एकनाथ कृपे आनंत वैष्णव । नामी नित्योछव । हरी गुरू प्रसाद || १ ||
एकनीष्ट तप सह्याद्रीचे तळी । कृष्णेचीया जळी । वेदवती संगम || २ ||
तुकाविप्र तया कुळीचा प्रसाद । कीर्तन आनंद । हरी गुरू स्मरण || ३ ||
नवल ते काये | एकनाथा घरी । देव काम करी | प्रतिष्ठानी || १ ||
नैराश्य कीर्तन | नव विधा भक्ति । नव रस युक्ति | सर्व काळ || २ ||
तुकाविप्र म्हणे | सदाचार सत्य | संपन्न श्री नित्य | एकनाथ || ३ ||
भानुदासाचे प्रीती । एकनाथाचे संगती || १ ||
देव जनार्दन कृपा । आगळी ते जपतपा || २ ||
बहु साहित्य याजला | नेम ऐसा चालायाला || ३ ||
गुरू दत्तात्रेया हेत। जाला जन्म येकनाथ || ४ ||
तुकाविप्र सत्य वार्ता । गुरू कृपेची हे कथा || ५ ||
भानुदास कुळी ही देव आले । येकनाथ वीठल संत भले || १ ||
आर्थ गहन उगवीले प्रीती | वाढवीली आभंग गुरुभक्ती || २ ||
तुकाविप्र श्रीनाथ येकोबाचा | दीन जन प्रसाद पंगतीचा || ३ ||
येकनाथाची भक्ती पाहोनीया । कृष्ण जाहाला देव श्रीखंडीया || १ ||
पाणी वाहे प्रसिद्ध आवडीने । भक्तीभावे प्रमाण आवडीने || २ ||
तुकाविप्र आवड देवाजीची । सेवा करी विठ्ठल भावार्थाची || ३ ||
येकनाथा येकवीरे | देणे खरे त्वा दिले || १ ||
तैसे मज देई आता | येकनाथा सारीखे || २ ||
विनवी केली खरी | या मसूरी येकांती || ३ ||
वर समर्थ देवोनी | कृपादानी तोशवी || ४ ||
तुकाविप्र म्हणे पुरी | कृपा करी अभंग || ५ ||
श्री भानुदासा कुळी एकनाथ | ही विष्णुमूर्ती उघडी कलीत || १ ||
जना दिसे मानव शुद्ध भोळा | वदे तुकाविप्र अभंग लीला || २ ||
श्रीखंडीयाची भाक आहे खरी | बैसलीया सहज लाभ घरी || १ ||
येकनाथ रायेच कमाईसी | बळकट केलीच आहे ऐसी || २ ||
तुकाविप्र म्हणोनी जनी वनी । सुखरूप आभंग संकीर्तनी || ३ ||
स्वये भानू जो भानू आराधियेला | तयाचे कुळी दिपकू दिव्य झाला || १ ||
हरी भक्ती लावूनी तारी समस्ता | नमस्कार श्री सद्गुरू एकनाथा || २ ||
उदार दाता गुणवंत कीर्ती | भावार्थ प्रेमा विषयी विरक्ती || ३ ||
ऐसा स्वये श्री एकनाथ | वदे तुकाविप्र कली समर्थ || ४ ||
स्वामी येकनाथा | जनार्दन प्रिया । अभंग वासिया | प्रतिष्ठान || १ ||
भानुदास कुळ | भक्तीच्या भूषणा । नर नारायणा | व्यास मूर्ति || २ ||
हरी गुरू भक्ती | सांप्रदाये तारू । त्रिमूर्ति सद्गुरू | दत्तात्रया || ३ ||
विप्र कृपामूर्ति | प्रताप तरणी । प्रसिद्ध करणी | तुझीच हे || ४ ||
करवीला वास कृष्णा वेणा तीरी | पंढरीची वारी करावया || ५ ||
ब्रम्हपुरी स्थळ दत्तात्रेय घाट | सप्त ऋषि पीठ अनादीचे || ६ ||
समान खडकी देहडे चरण । उभये प्रमाण हरिहर || १ ||
हेमतरु शिव-नाथ वृंदावन । विठ्ठल निधान विटेवरी || २ ||
तेथे तुकाविप्र तटाकी उभये | गुरु दत्तात्रेये आवडी हे || ३ ||
प्रसिद्ध पूजनी पत्र पाठवले | कीर्तन पावले पूजे नीते || ४ ||
देहभाव हाते पाठवला लिखा | जनार्दन एका भक्ती भाव || ५ ||
पावल्या पत्राचे उत्तर आभये | आसीर्वाद माये बालकासी || ६ ||
माझे गाती नाम तया मागे पुढे | ब्रम्ह उभे धेंडे आ ब्रम्हे मी || १ ||
भक्त रक्षावया | छाया पीतांबर | केली कटी कर ठेवोनीया || २ ||
अनंता प्रकारे भक्त वाढवावे | अवतार भावे आनंतशा || ३ ||
निचाड विरक्त उदास वर्तती | कीर्तनी नाचती भक्त माझे || ४ ||
तयाचे सर्वांग मजलाची होणे | सर्वही करणे त्याचे मज || ५ ||
भये चिंता नाही आभये माझे मी | भक्त भोळे नामी वितरागी || ६ ||
विश्वरूपे मीची सर्वांगे नटलो | विश्वात्मा जाहलो भक्तदेही || १ ||
माझा भक्तिभाव जयाचीया घरी | येरा कैची थोरी तयापुढे || २ ||
ऐसे पत्र माझे विप्र तुकीयासी | जेष्ठ एकादशी शुद्ध भ्रूगू || ३ ||
शालीवान शक सोळाशे त्र्याणवी । पत्र भेटी नवी ब्रह्मपुरी || ४ ||
खर नाम संव’त्सर माजी भेटी कीर्तन वैकुंठी हरिहर || ५ ||
हेम तरु तळी सभा मंडपांत | कोरे पत्र संत सभे आले || ६ ||
वाचिता प्रमाणे बहुंनी वाचीली । प्रसन्न जाहली सर्व सभा || १ ||
अभंग हा रंग कीर्तन विठ्ठल । पत्रार्थ विठ्ठल सुखरुप || २ ||
देव भक्त सुखी सह परिवारे। प्रीती सहोदरे भेटी गोष्टी || ३ ||
धालेपणे बाळ माऊली पुढती । नाचे आत्म प्रीती आत्मत्वेसी || ४ ||
पाडसासी क्रीडा पुढती हरिणी। भक्त चक्रपाणी पुढती हे || ५ ||
गतकली चार हजार आठसे | बहात्तर ऐसे आजीवरी || ६ ||
प्रमाण ते घडी भोळीयांचे संगी | कीर्तन प्रसंगी पत्र भेटी || १ ||
जंबुद्वीप दंड-कारण्य देशांत । उत्तर विख्यात कृष्णातीर || २ ||
गोदावरी तीर दक्षिण अभंग। कटीकर धींग विठ्ठलाई || ३ ||
धुंडी दंडपाणी, गुहा गंगा कासी । जवागळी ऐसी व्यासवाणी || ४ ||
कलयुगी व्यास एका जर्नादन । अभंग कीर्तन तयाप्रति || ५ ||
त्रिमुर्ती सावळी तळवटी उभा । वेदश्रुती गाभा येकनाथ || ६ ||
प्रसिद्ध अखेर गाई गोपाळाचा । आश्रम ऋषीचा ब्रह्मपुरी || १ ||
उदार वोळला त्रिमुर्ती विठ्ठल । श्रीकृष्ण विठ्ठल वेणी माये || २ ||
जळ स्थळ देव भक्त वेदशास्त्र । आश्रम पवित्र ब्रह्मपुर || ३ ||
सर्व देवा मत नित्यावळी काज । आनंदाचे भोज सर्वभावे || ४ ||
हरि दाता भोक्ता हरि कर्म धर्म। पुरी मुख्य ब्रह्म क्रिया ऐसी || ५ ||
सुकृत येकाचे भोक्ता येक चित्त । येकला येकांत श्रुती गर्भ || ६ ||
तुकाविप्र कोरे पत्र निरुपम | अर्थ हरीनाम विठ्ठलाई || ७ ||
संत भाई भट
आळजापूरी भाई भट | सत्वगुणी ब्रह्मनिष्ठ || १ ||
धन दारा तृणवत । ऐसा विदेही विरक्त || २ ||
भट बाबा सिद्धेश्वर । वासी केले नृसिंहपूर || ३ ||
दोघे समान वैदिक । भोळे प्रेमळ भाविक || ४ ||
तुकाविप्र म्हणे जोली । ऐसी अभंग देखिली || ५ ||
संत तुकाराम आणि कुटुंब
ऐसे किती याची मऱ्हाष्ट्र देशात | विठोबाचे भक्त निरुपम
देशो देशी भक्त अनंत अपार | विठ्ठल साचार देवाचे या
तुकाराम वाणी कुणबी जातीचा | भक्त विठोबाचा निरुपम
कान्होबा तयाचा बंधु कीर्तीध्वज | पुत्र भक्तराज नारायेण
तुकाविप्र म्हणे नातू पंतु त्यांचे | भक्त विठोबाचे कुटुंबीत
संत तुकाराम – चिंचोली
चिंचोलीचा तुकाराम | ब्रह्मचारी निरुपम || १ ||
ज्ञान वैराग्य आगळे | शुद्ध अंतर मोकळे || २ ||
डोळेभरी देखियेले । तेणे चित्त संतोषले || ३ ||
तुकाविप्र म्हणे भेटी । ब्रह्मपुरी कृष्णातटी || ४ ||
संत तुकाराम – बेलेश्वर
तुर्त देखियेल नर । संत साधु अवतार || १ ||
तुकाराम बेलेश्वरी । योगी राणा अवतारी || २ ||
सर्व गुणे उदासीन । जया मातीसम धन || ३ ||
भोळा विरक्त सात्विक । देखियेला साधु येक || 4 ||
तुकाविप्र म्हणे तूर्त। ऐसे देखियेले संत || 5 ||
संत तुकाराम – देहू
तुकारामे आण खरीच वाहीली । दोघे जाती कली नर्कवासा || १ ||
सकळ ही वर्ण येके ठाई खाती । आवडती भ्रष्ट खादाड ते || २ ||
तुकाविप्र म्हणे याची वीसी आण । वाहीली प्रमाण विठोबाची || ३ ||
संत तुकाराम – देहुकर
तुका तुका ऐसा | त्रिभुवनी केला । वैकुंठासी नेला | पराक्रमे || १ ||
ऐसा नामदेव | जागृत अभंग । कीर्तन प्रसंग जेथे तेथे || २ ||
पंढरी वैकुंठी | नामा वीराजतो । अवतार देतो | भेटी लाभ || ३ ||
तुकाविप्र म्हणे | सर्व सर्वत्रासी । नामा दीवा निसी | भेटताहे || ४ ||
संत तुकाराम
बद्रीवनासी यावया । काय कारण तुकीया || १ ||
पूर्वजन्मी हेत केला । तैसा तूर्त फळा आला || २ ||
विनायकासी पूजावे । हेत केला होता जीवे || ३ ||
तुका विप्र हेत होणे । बद्रीवनी गुरु देणे || ४ ||
सद्गुरू शंकराचार्य
कलयुगी श्री शंकर । आवतार आचार्ये || १ ||
ज्यांनी ब्राह्मणे स्थापिले । चालविले स्वधर्म || २ ||
केला जय ब्राह्मण्याचा। पांखड्यांचा संहार || ३ ||
बोलाविले परब्रह्म । केले नाम कीर्तन || ४ ||
तुकाविप्र म्हणे संत । देव सत्य शंकर || ५ ||
विठ्ठल महाराज चातुर्मासे
काय दादा जाणीतले | ते लिहिले पत्रार्थी || १ ||
संत राहाटी जनासी | काय कैसी ठावूकी || २ ||
जन बोलण प्रमाण | संत कोण मानती || ३ ||
तुम्ही जणांचे ऐकता | ते लिहिता जनासी || ४ ||
तुकाविप्र म्हणे संत | मुक्त हेत सर्वदा || ५ ||
संत ज्योतिपंत
कोळेश्वरा तुज | गाठीले पूजनी । दिन अस्तमानी | भृगुचिया || १ ||
कृष्णा वेण्या तीर | उत्तर प्रमाणे । उत्तर वाहाणे | जळरुपा || २ ||
जोती गोपाळाची | माझी तुझी भाक । जाहाली ते येक | साक्ष तुझी || ३ ||
तुकाविप्र म्हणे | पाताळासी नेला । तरी ही तुम्हाला | साक्ष देणे || ४ ||
संत कासीराज – कराड
कासीराज कऱ्हाडात । भोळा प्रेमळ विरक्त || १ ||
ज्ञानी विवेकी सात्विक । साधु प्रमाण भाविक || २ ||
बहुश्रुती क्षमाशील । साक्षी अंतर निर्मळ || ३ ||
तुकाविप्र म्हणे भेटी । ब्रह्मपुरी कृष्णा तटी || ४ ||
कोकणातील संत कृष्ण भट
कृष्ण भटाचे इष्ट सर्वेश्वर | म्हणोनी नाम पावला कृष्णेश्वर || १ ||
माझा विठो माझ्यासाठी | निघाला कोकण भटीसी || २ ||
लीला काही महादेवासी | दावूनी निवारावे संदेहासी || ३ ||
चिपळूण पाग कृष्णेश्वर | नमन तया वारंवार || ४ ||
तुकाविप्र उभा कीर्तनासी | लाभ घावला भाग्यासी || ५ ||
संत दादा खंडभट
खंडभट दादा भले । साधु अभंग चांगले || १ ||
राजमान्य वीतरागी । तया सम राजा मुंगी || २ ||
दादा ऐसा खंडभट । योगी देखिला आविट || ३ ||
भोळा प्रेमळ सात्विक । ज्ञानी, विरक्त वैदिक || ४ ||
तुकाविप्र म्हणे भला । खंडभट देखियेला || ५ ||
- सर्व संत चोखामेळा , नरहरी सोनार, गोरा कुंभार , सावता माळी , मीराबाई, मुक्ता बाई , बंका, राका बांका , सजन कसाई
चोखामेळा नरहरी । या संसारी तारीले || १ ||
गोरा सावता कबीर । केले थोर कृपेने || २ ||
मीरा मुक्ता वच्छा बंका । रांका बाका सजणा || ३ ||
तुकाविप्र ऐसा तारी । कृपा करी विठोबा || ४ ||
भक्त पुंडलीक
चंद्रभागे पुंडलीका । भावे नमस्कार येका || १ ||
प्रिती बहु असो डोळे । भेटी अभंग सोहळे || २ ||
नित्य आता संध्या स्नान | चंद्रभागे ब्रह्म यज्ञ || ३ ||
सर्व भावे ब्रह्म कर्म । भूमी वैकुंठी हा नेम || ४ ||
तुकाविप्र विनवणी । सत्य जोडोनिया पाणी || ५ ||
संत छैया महाराज – पैठण
छैया मय्या पैठणात । जाले गंधर्व कलीत || १ ||
एकनाथाचे वंशज । मोठे साधु कीर्तीध्वज || २ ||
निरुपम देखियेले । प्रतिष्ठानी तूर्त काळे || ३ ||
तुकाविप्र संतोषला । तया पाहोनी संताला || ४ ||
संत पुरंधर , संत रामचंद्र , संत चांद बोधले , संत दामाजी
जनमित्र पुरंधर | रामचंद्र कानडा || १ ||
चांद बोधला नीपट | हे अवीट प्रेमळ || २ ||
दासोपंत मालोपंत | जाले संत दामाजी || ३ ||
बोधराज भागीरथी | तुवा प्रीती तारीली || ४ ||
तुकाविप्र म्हणे हारी | ऐसा तारी पतीत || ५ ||
संत जोतीपंत
जोती गोपाळ विख्यात । मूर्तिनेम चौदाशत || १ ||
व्यास वरदी प्रेमळ । भोळा भाविक निर्मळ || २ ||
नामधार निरुपम । नित्य कथा हरिनाम || ३ ||
तुकाविप्र म्हणे ज्योती । संत देखिली विभूती || ४ ||
संत महादेव – संत तुकाराम देहुकर यांचे पंतू
तुकोबाचे कुळी नि:सीम सद्भक्त । विदेही विरक्त महादेव || १ ||
कुलोद्धारी होय पुरुष प्रसिद्ध । अंतःकर्ण शुद्ध सत्य ज्याचे || २ ||
वैष्णवाचा राव महादेव भोळा । उदास मोकळा ब्रह्मनिष्ठ || ३ ||
तुकाविप्र तया सेवेचा सेवक । विठ्ठलचि एक महादेव || ४ ||
संत दादा दैठणे
दादा विख्यात दैठणे । काला पंढरी खेळणे || १ ||
दादा दैठणाचे वासी । तृण तुल्ये धन रासी || २ ||
तीन हत्ती ज्याचे घरी । मान काल्याचा पंढरी || ३ ||
तुकाविप्र काला खेळी । भेटी अभंग धुमाळी || ४ ||
संत दामाजी
दामाजी पंतांनी पंढरीची वारी | केली तेंव्हा हरी साह्ये जाला || १ ||
सर्वत्रासी मान्ये व्यापारी ऐसेले । वारकरी जाले पंढरीचे || २ ||
सकळ ही चला पंढर-पूरासी । भेटाया वरासी रुक्मिणीच्या || ३ ||
तुकाविप्र म्हणे संसारी असता । प्रीती रमाकांता सवे केली || ४ ||
संत द्वैपायन – माशाळ
द्वेपायन भीमातीर | वासी माशाळ माचणुर || १ ||
शुद्ध वैष्णव प्रेमळ | ज्ञानी अंतर निर्मळ || २ ||
नाही मनी द्वैत भाव | ऐसे विदेही वैष्णव || ३ ||
वृत्ती समान जयाची | भेटी जाहाली तयाची || ४ ||
तुकाविप्र म्हणे भली | भेटी ऐसी तूर्त झाली || ५ ||
भक्त धरणीधर – चिंचवड
धर्णीधर येक देव । चिंचवडी योगीराव || १ ||
गणपती उपासक । भोळा प्रेमळ भाविक || २ ||
शुद्ध विदेही विरक्त । निरुपम जीवन्मुक्त || ३ ||
देखियेला डोळे भरी। तेणे आनंद अंतरी || ४ ||
तुकाविप्र सुखी जाला । धर्णीधर पाहियेला || ५ ||
संत धना जाट
धना जाटाचीया शेती । करी कमाई श्रीपती || १ ||
गायी विठ्ठले वळिल्या । प्रीती भक्ताच्या पाळील्या || २ ||
देवे मागे केली थोडी । पुढें बहुत आवडी || ३ ||
तुकाविप्र म्हणे धना । जाट उभा संकीर्तना || ४ ||
संत नामदेव
निसी माजी चंद्र | दिवा सूर्य जैसा । नामदेव तैसा | भक्ता माजी || १ ||
देवा माजी गुरू । दैत्या माजी शुक्र । भक्ता माजी थोर | नामा तैसा || २ ||
ऋतु माजी जैसा | अभंग वसंत । तैसा नामा संत | सर्वामाजी || ३ ||
तुकाविप्र म्हणे | काष्टात चंदन । नामदेव धन्य | संतांमाजी || ४ ||
नामदेवे गुरू केला । तेव्हा त्याला मानीले || १ ||
साक्षात्कार देवाजीचा । ऐसा त्याचा वृत्तांत || २ ||
तेथे गुरूवीन ज्ञानी । तरू जनी म्हणती || ३ ||
तुकाविप्र म्हणे खोटी । आस पोटी तरू हे || ४ ||
नामदेवा ऐसे भले । वानीयेले संतानी || १ ||
देवा ऐसा ज्याचा सखा । या साधना ऐसेला || २ ||
काये केवा ईतराचा । न गुरू याचा सामान्ये || ३ ||
तुकाविप्र म्हणे वेडी । सार जोडी नेणती || ४ ||
नामदेव संत | प्रसिद्ध प्रेमळ | विठ्ठल निर्मळ | अवतार || १ ||
गोणाईच्या पोटी | भक्ती साठी देव | जाले संतराव | जन तारू || २ ||
तुकाविप्र म्हणे | ऐसा वीठ्ठल हे । जन्म घेत आहे | युगा युगी || ३ ||
नामदेव आवतार । तया दिधला हा वर || १ ||
हरी विठ्ठल प्रसिद्ध । सर्व काळ वाचे शुद्ध || २ ||
प्रेम सर्वांगासी गाढे । नित्य कीर्तन उघडे || ३ ||
ऐसे देणे नामदेवा। देवराया दिल्हे तुवा || ४ ||
तुकाविप्र म्हणे थोर | धन्ये विठ्ठल उदारा || ५ ||
नामा अवतार | निरुपम जाहला । अभंग वदला | शतकोटी || १ ||
बहुतासी केला | स्वरूप साक्षात्कार | ऐसा अवतार | दुजा नाही || २ ||
कुटूंब जयाचे |सर्व साक्षात्कारी | आस तीळभरी | चिंता नाही || ३ ||
तुकाविप्र म्हणे | उदाराचा राव। संत नामदेव | कलयुगी || ४ ||
नामदेवे भक्ति | भावार्थ लाविला | सर्वत्र जनाला | कलयुगी || १ ||
वैराग्ये संपत्ती | बहुता दिधली | थोर कीर्ति केली | त्रिभुवनी || २ ||
मोठे मोठे राजे | छपन्न भाषेचे | नामदेव साचे | उद्धरीले || ३ ||
तुकाविप्र म्हणे | नामदेव धन्य | चहु वर्णा मान्य | संतराव || ४ ||
नामदेवा ऐसा | भक्त कलयुगी । प्रमाण त्रिजगी | दुजा नाही || १ ||
निरूपम नामा | देवा आवडता । तयासी समता | नाही दुजी || २ ||
शतकोटी ग्रंथ | अभंग वदला । शिरोमणी जाला | भक्त येक || ३ ||
तुकाविप्र म्हणे | धन्य नामदेव | कलीत वैष्णव | ज्ञानसिंधु || ४ ||
नामाचा प्रताप | अवतरले वेद । कराया आनंद | भू देवासी || १ ||
ऋचा शत कोटी, | ऋक येजू साम । वेदी या निस्सिम | आहेतची || २ ||
प्राकृत भाषेत | वेद शतकोटी | जीव कोटी कोटी | उध्दराया || ३ ||
प्रेम भक्ती भावे | केला हा तारवा | उद्धाराया जीवा | नामदेवे || ४ ||
तुकाविप्र म्हणे | नामयाच्या साक्षे । उद्धार प्रत्यक्षे | होत आहे || ५ ||
नामयाची भक्ती | पाहोनीया आला । शरण तयाला | ब्रह्मदेव || १ ||
उत्पत्ती विचार | आपण तो केला । मनी नाही आला | रक्षणाचा || २ ||
नामयाचे काम | मजहोनी थोर । त्यासी नमस्कार | सर्वभावे || ३ ||
तुकाविप्र म्हणे | नामदेवे केला । ब्रह्मदेव चेला | आपुलाची || ४ ||
नाम पूर्ण ब्रह्म | जाहाले सकाम । इच्छा ही आगम | व्याले वीस्व || १ ||
नामची विठ्ठल | ज्ञान हे विठ्ठल । ज्ञेय ही विठ्ठल | ज्ञाता नामा || २ ||
तो पण विठ्ठल | त्रिपुटी सकळ । एकची विठ्ठल | पूर्णब्रह्म || ३ ||
तुकाविप्र म्हणे | नामा व्यापक । जाणा सकळीक | तुम्ही ऐसे || ४ ||
नामा संताचीये माये | ज्ञानेश बापची होये || १ ||
संत भक्त लेकरासी | विठ्ठल माऊली पोसी || २ ||
भक्त पुंडलीक सखा | प्रेमळ सर्व या लोका || ३ ||
चंद्रभागा हे बहीण | पंढरीची असे खूण || ४ ||
संत भक्त हे सोयरे | नाम गहन सत्य सारे || ५ ||
तुकाविप्र भाव ऐसा | ठेवा तुम्ही भरवसा || ६ ||
नामदेव भाक बळी । प्रेम कली कीर्तन || १ ||
शत सेवट कोटीचा। कीर्तनाचा प्रसंग || २ ||
विप्रवर्या सत्यव्रता । अवधुता सद्गुरु || ३ ||
विनवणी परिसली । फळा आली प्रसाद || ४ ||
तुकाविप्र म्हणे कोट । हा शेवट शताचा || ५ ||
पराक्रमी किती | अवतार नामा | आगळा महिमा | नामयाचा || १ ||
नामदेवे कृपा | तुकयासी केली | वैकुंठासी नेली | त्याची तनु || २ ||
देही असोनीया | बहु केली काजे | सहजी सहजे | नामयाने || ३ ||
तुकाविप्र म्हणे | देह गेल्यावरी । कृपा केली खरी | तुकोबासी || ४ ||
प्रथम कलीत नामदेवा ऐसा | उद्धरिला कैसा कुटुंबेसी || १ ||
दामासेटी बाप गोणाबाई माता | सणकादी भक्ता ऐसे केले || २ ||
उपमन्ये ध्रूव प्रल्हादा समान | बाळा दिला मान नामयाचा || ३ ||
तुकाविप्र म्हणे ऐसे किती भक्त | विठ्ठले विख्यात उद्धरिले || ४ ||
प्रतीपाळावया | विष्णु हाची देव । नाही समभाव | तया पाशी || १ ||
विरक्ता तारितो | आसक्ता मारितो । अधोगती देतो | तयाना तो || २ ||
भेदभाव आहे | त्याजपासी आला । कळो हे आम्हाला | ऐसा गुण || ३ ||
स्व रक्षणा करी | सीव नाम स्मरण । नामची प्रमाण | तरावया || ४ ||
तुकाविप्र म्हणे | नामाची कारण | आव्यक्त प्रमाण | तरावया || ५ ||
परब्रम्ह व्याले ॐकार उद्भव | म्हणताती देव आदिनाम || १ ||
नामदेव नामा नाही यात भेद | अभंग आनंद स्वरूपीया || २ ||
ॐकार हा व्यक्त नामा व्यक्ताव्यक्त | अनुपम भक्त नामदेव || ३ ||
तुकाविप्र म्हणे नामा गुणातीत | प्रकृती अतित सर्वकाळ || ४ ||
युगायुगीचा हा | नामा भक्त भोळा | उदास मोकळा | ब्रह्मनिष्ठ || १ ||
भक्ता माजी बळी | नामा सर्वगुणे | आगळे करणे | नामयाचे || २ ||
देवाचा अत्यंत | आवडता नामा | सत्य केली सीमा | नामदेवे || ३ ||
तुकाविप्र म्हणे | नामा मूर्तिमंत | भेटताहे तुर्त | भाविकासी || ४ ||
शतकोटी ग्रंथ | छप्पन्न या भाषा । वदला तो कैशा | नामदेव || १ ||
जैसा जो भेटला | तयासी बोलीले । भाषेने शोभले | तया तया || २ ||
नाही उणे कोठे | अक्षर व्यंजन । अभंग कीर्तन | नित्यावळी || ३ ||
तुकाविप्र म्हणे | नामदेव खरा । भक्त-राज तुरा | कलयुगी || ४ ||
शतकोटी ऐसा | ग्रंथ केला सिद्ध त्रिजगी प्रसिद्ध | नामयाने || १ ||
नामा तुका विप्र | द्रष्ट्रे हे साचार । तिघांचा ओंकार | येक नामा || २ ||
आदि मधी अंती | सर्वव्यापी नामा | शारदा महिमा | ना शके वर्णु || ३ ||
तुकाविप्र युग्म | कृष्णराधा जैसे । विठू नामा तैसे | शोभीवंत || ४ ||
शतकोटी वेदातील । नामया संत विठ्ठल || १ ||
महावाक्य हे प्रसिद्ध | प्रमाण सद्गुरु बोध || २ ||
देवभक्त दोहोपणे । विठल नामा शोभणे || ३ ||
तुकाविप्र म्हणे बोध। अद्वैत प्रमाण सिद्ध || ४ ||
शतकोटी ऋचेतील | संत नामदेव विठ्ठल || १ ||
माहावाक्ये हे प्रसिद्ध | प्रमाण सद्गुरू बोध || २ ||
नाम नामी नामा येक | जाणताती हे भावीक || ३ ||
तुकाविप्र भाव सत्य | फळ जीव शीव ऐक्य || ४ ||
सर्व गजामध्ये | जैसा ऐरावत । भक्ताचिया पंक्ती | नामा तैसा || १ ||
चिंतामणी जैसा | सर्व पाषाणांत । तैसा येक भक्त | नामदेव || २ ||
रागात भैरव । पक्षात गरुड । नामया उघड | भक्त तैसा || ३ ||
धनवंता मध्ये | जैसला कुबेर । म्हणे तुकाविप्र | नामा तैसा || ४ ||
संत नामदेव कालीन संत
रोहिदास आणि | कबीर कमाल । प्रगटा आणिले | नामदेवे || १ ||
नानकादी भक्त | प्रगट व्हावया | मुख्य हाची पाया | नामदेव || २ ||
कुर्मदास गोरा | सावता प्रगट । नामदेवे नीट | भक्त केले || ३ ||
तुकाविप्र म्हणे | चोखामेळा बंका । नामदेवे लेका | उद्धरिले || ४ ||
राजा त्रिलोचन | सजण कसाई । भक्त मीराबाई | गिरीधर || १ ||
धना जाट कर्मा-बाई राका बाका । पीपा राजा सखा | नामयाचा || २ ||
भक्ती परायेण | नामदेवे केले । राजे भले भले | धुरंधर || ३ ||
तुकाविप्र म्हणे | नामा आवतार । प्रल्हाद साचार | उद्धव हा || ४ ||
निऊर्ती सोपान | ज्ञानेश मुक्ताई । नामयाचे पाई | पंढरीसी || १ ||
विसोबा खेचर | चांगया प्रमाण । अखंड बैसणे | येके ठाई || २ ||
नरहरी पर्सा | भागवत जनी । श्रोते हे कीर्तनी | नामयाच्या || ३ ||
तुकाविप्र म्हणे | नामा निरूपम । देवासी परम | आवडता || ४ ||
संत नरसी मेहता
नर्सी मेहत्याची हुंडी । देवे भरीली आवडी || १ ||
रस्त दामाजी पंताची । भरियेली देवे याची || २ ||
ऐसा भक्तासाठी होये । पडिवार लाज काये || ३ ||
तुकाविप्र म्हणे भला । भक्ती श्री हरि भुलला || ४ ||
संत निवृत्ती नाथ
नीवृत्ती नाथ | शंकर आवतार || १ ||
जड मुढ तारावया । धरीयेली नरकाया । कलयुगी प्रीती फार || २ ||
हें ची युगायुगीं काया । संत जन्म धरोनीया । वाढवाया भक्तीसार || ३ ||
तुकाविप्र म्हणे ऐसे । मानवची देव तैसे । जडजीवा तारणार || ४ ||
शंकर स्वामी | निवृत्ती नाथ जाले || १ ||
ज्ञानदेव सोपानासी । उपदेश मुक्ताईसी । आवतार उघडीले || २ ||
करवीले पराक्रम । तीघाचेही केले नाम । ब्रह्मडोळा दाखवीले || ३ ||
तुकाविप्र म्हणे नाथ । नीवृत्ती श्री कृपावंत । सर्वगुणे सत्य जाले || ४ ||
संत भानुदास आणि इतर संत
नीऊर्ती सोपान मुक्ताबाई मीरा । भेटी कटी करा धांव घेती || १ ||
भानुदास चक्र-पाणी सूर्यपंत । वारकरी संत जनार्दन || २ ||
स्वामी येकनाथ वारकरी भोळे । उदार मोकळे ब्रह्मज्ञानी || ३ ||
तुकाविप्र म्हणे भावार्थी निसीम । ब्राह्मण हे ब्रह्म जाणीतले || ४ ||
भानुदास चक्रपाणी सूर्यपंत | स्वामी येकनाथ | प्रतिष्ठानी || १ ||
आजीवरी त्यांचे | कुळ त्याची पाडे । चालीले रोकडे | कलयुगी || २ ||
विठोबाचे दास | कुलीन चांगले । भूदेव झाले | असंख्यात || ३ ||
तुकाविप्र तया | कृपेचा विस्तार | विठ्ठल साचार | ब्रह्मपूरी || ४ ||
संत चोखा , संत नरहरी सोनार , आणि इतर संत
नरहरी जाती | सोनार पंचाळ । सद्भक्त निर्मळ | विठोबाचा || १ ||
परीसा भागवता | कुटुंब सहित । विठोबाचा भक्त | कलयुगी || २ ||
चोखा आणि बंका | जातीचे माहार । दास धुरंधर | वीठोबाचे || ३ ||
तुकाविप्र म्हणे | सहीत कुटुंब । भक्त हे स्वयंभ | उद्धरीले || ४ ||
संत गोपाळनाथ – कराड
नाथ अंतर निर्मळ । वास त्रिपुरी गोपाळ || १ ||
ज्ञान वैराग्य कऱ्हाडी । मूर्ती गोपाळ उघडी || २ ||
विश्वमान्य एक धेंडे | नाथ गोपाळ रोकडे || ३ ||
संत गोपाळ वैष्णव | देखियेला योगिराव || ४ ||
तुकाविप्र तुर्त भेटी । जाली अभंग त्रिपुटी || ५ ||
संत लिळा विश्वंभर आणि इतर संत
नामदेव जनाबाई | ज्ञानदेव मुक्ताआई || १ ||
नाथ निवृत्ती सोपान | येकनाथ जनार्दन || २ ||
भानुदास चोखामेळा | विश्वंभर बाई लिळा || ३ ||
तुकाविप्र म्हणे तैसा | चला पंढरीसे कैसे || ४ ||
सद्गुरू रंगनाथ स्वामी निगडीकर
नमियेली निजरंग माऊली। समाधी या निगडी || १ ||
केला सर्वांचा निजभावे उध्दार । सर्वस्व जाले अवतार । नरदेह सर्वोत्तम हे सर्व । कृष्णा वेण्या थडी || २ ||
भक्ती भावाने विचरोनी | संकीर्तन रंगणी | प्रेमे नाचतसे निजधानी । सर्वार्थ करोनी | देव केला गडी || ३ ||
मार्गशिर्ष या विभूती । मासात हे तिथी । कृष्ण दशमी पुण्यतिथी । संत कीर्ती | उभविली देह गुढी || ४ ||
तुकाविप्र या संत संगी। कीर्तन प्रेमरंगी | नाचत उभा या कलयुगी । नमुनी संत योगी | धन्य होय गडी || ५ ||
संत भीमराज – कल्याण मठ डोमगांव
डोमगांवी सीना तीरी । भीमराज ब्रह्मचारी || १ ||
स्वामी कल्याण मठाचे । भीम भूषण भक्तीचे || २ ||
शांति क्षमेचे आगर । ब्रह्म विद्येचे भांडार || ३ ||
साधु भीमराज धन्ये । संत सभ माजी मान्ये || ४ ||
तुकाविप्र तया भेटी । ब्रह्मानंद शतकोटी || ५ ||
संत पांडुबाबा आयचित
पांडूबाबा आयाचित । वास पंढरी विख्यात || १ ||
ज्ञानसिंधू क्षमासील। साधु अंतर निर्मळ || २ ||
तूर्त निरूपम मूर्ति । देखीयेली शिळ शांती || ३ ||
तुकाविप्र सुखी जाला । देखोनिया पांडोबाला || ४ ||
संत कबीर ,संत सजना कसाब, संत महमद शेख, गुरु नानक
पंढरीची वारी कबीराने केली । पाउला पाउली येज्ञे जोडी || १ ||
सजणा कसाब महमद सेक । विदेही नानक वारी करी || २ ||
पीपाधना जाट दादु खोजु कर्मा । मीरा मुक्ता नामा भक्तराज || ३ ||
तुकाविप्र म्हणे पंढरी वैकुंठी । संत ऐशा कोटी शतमाळा || ४ ||
संत विठोबा चातुर्मासे
पांडुरंग दादा आष्टक लिहिले | ते रूपा आणले पाहिजे की || १ ||
जैसी केली स्तुति तैसे कृपाबळ | दिधले निर्मळ पाहिजे की हो || २ ||
सर्वज्ञ चेतूरा विनवणी काय | धरीयेले पाय कृपेसाठी || ३ ||
तुकाविप्र म्हणे खरी बोली बोला | जाणूनी संताला संत पणे || ४ ||
संत तुकाराम
बद्रीवनासी यावया । काय कारण तुकीया || १ ||
पूर्वजन्मी हेत केला । तैसा तूर्त फळा आला || २ ||
विनायकासी पूजावे । हेत केला होता जीवे || ३ ||
तुका विप्र हेत होणे । बद्रीवनी गुरु देणे || ४ ||
संत बाबा मुदगल
बाबा मुद्गल निर्भीड | वास पंढरी निचाड || १ ||
सत्य सांगणे जनासी । राव रंक सर्वत्रासी || २ ||
निरुपम जाली मूर्ती । येक मुदगल विभूती || ३ ||
तुकाविप्र दीना भेटी । तया पंढरी वैकुंठी || ४ ||
संत कवि श्रीरंग
ब्रम्हचारी नारायण । कवि श्रीरंग प्रमाण || १ ||
ज्ञानी विरक्त निचाड । साधु निष्काम निर्भीड || २ ||
इंद्रपूरवासी संत । योगीराव अगर्वीत || ३ ||
देखियेला डोळे भरी । संत येक ब्रह्मचारी || ४ ||
तुकविप्र सुखावला । येक पाहोनी तयाला || ५ ||
संत बाबादेव – बीड , संत मनसाराम – सातारा , संत रामनाथ – आटपाडी
बाबा देवता बीडात । साधू देखिला अजात || १ ||
साताऱ्यात मनसाराम | देवता ही तयासम || २ ||
रामनाथ आटपाडी । तैसा देवता ही बीडी || ३ ||
तिन्ही समान साजिरे । दृष्टी देखियेले खरे || ४ ||
तुकाविप्र म्हणे भले । साधू पुरुष देखिले || ५ ||
संत बाबा शिवदिन – पैठण, संत सदानंद – सासवड , संत बाबा गोसावी – इंदापूर
बाबा संत शिवदिन । वासी मुख्य प्रतिष्ठान || १ ||
शिघ्र कवि निरपेक्ष । नाथ केसरीचे शिष्य || २ ||
सदानंद सासवडी । वृत्ति जयाची उघडी || ३ ||
बाबा गोविंद गोसावी । इंद्रपुरी शीघ्र कवी || ४ ||
तुकाविप्र म्हणे भले । साधु आगळे देखिले || ५ ||
संत बाबा राघोपंत – पंढरपूर
बाबा राघोपंत | निसिम वैरागी | संत कलीयुगी | ज्ञाननीधी || १ ||
देशस्त ऋग्वेदी | धर्म परायण | समर्थ ब्राम्हण | ब्रम्हकर्मे|| २ ||
सर्वस्वे विठ्ठली | जयाचा भावार्थ | प्रेमळ विरक्त | सत्वगुणी || ३ ||
कर्म धर्म अती | आवडते देवा | राघोपंत बाबा | नामधार || ४ ||
उत्तम साधन | सर्व काळ ज्याचा | भावार्थ भक्तीचा | मेरू जैसा|| ५ ||
धन्यपणे काळ | पंढरी वैकुंठी | निरंतर गोष्टी | देवा सवे || ६ ||
सर्व संतांमाजी | विख्यात प्रमाण | विठ्ठल स्मरण | सर्व काळ || १ ||
ऐसीयाचा काळ | अंत होणे आला | सकळ संताला | सुचवीले || २ ||
अंतकाळी प्रेमा | निसिम वेदांती | धन्य राघोपंती | म्हणविले || ३ ||
सद्वीद्या संपन्न | विनीत सर्वासी | समता तयासी | तेची एक || ४ ||
विश्वासे शेवट | भजने लावीला | धन्यपणे गेला | नीज धामा || ५ ||
आधिक आषाढ | कृष्ण महापर्व | द्वादशी अपूर्व | भूमीवार् || ६ ||
सोळासे त्रेण्णव | शक शालिवान | अभंग कीर्तन | संत सभा || १ ||
समस्ताचे साक्षी | धन्य संतराव | सत्कर्मी वैष्णव | निरुपम || २ ||
खर संवछरी | ब्रम्हानंद युक्त | गेले राघोपंत | निजधामा || ३ ||
प्रसिद्ध पवाड | पंढरी भरोनी | उरवीला जनी | सांगावया || ४ ||
तुकाविप्र वाणी | सार्थका लागली | चरित्र विठ्ठली | निरुपम || ५ ||
समस्त बडवे – पंढरपूर
बडवे हे माझे देव । तेथे काय दुजा भाव || १ ||
अष्ट अधिकारी संत । हे तो विठ्ठल समर्थ || २ ||
देवा तया भेद नाही । ऐसी वेद श्रुती गाही || ३ ||
देव अष्ट अधिकारी । नररूपे या पंढरी || ४ ||
संत रूपे देशोदेशी । भेद नाही यासी त्यासी || ५ ||
तुकाविप्र सर्वा पायी । ठेवी आवडीने डोई || ६ ||
संत बोधले महाराज
बोधले प्रसिद्ध वारकरी संत । तुकोबा विख्यात वारकरी || १ ||
कुटुंब सहित आजीवरी भाव । तो चि अनुभव तया घरी || २ ||
बहुतासी वाट दावीयेली संती । थोर केली कीर्ति त्रिभुवनी || ३ ||
तुकाविप्र म्हणे पंढरीसी चला । भेटाया विठ्ठला कलयुगी || ४ ||
संत बहिरा पिसा, संत नागा , संत दामाजी , संत विसोबा खेचर, संत मालोपंत , संत नरहरी
बहेरा पिसा आणि जग मित्र नागा । भक्त पांडुरंगा | आवडते || १ ||
विसोबा खेचर | जातीचे ब्राह्मण । दामाजी प्रमाण | पंता ऐसे || २ ||
मालोपंत आणि | नरहरी पंत । विठोबाचे भक्त | कलयुगी || ३ ||
तुकाविप्र म्हणे | विठोबाचे दास । विजयी प्रत्यक्ष | त्रिभुवनी || ४ ||
संत चोखा
भला गर्जे नाम हारी । कोणी तरी आसेना || १ ||
चोखा महारची होता । हरी सत्ता पालटी || २ ||
जनी दासी खरी होती । नामे कीर्ती विठल || ३ ||
नाम विठल गर्जली । उद्धरीली सर्वस्वे || ४ ||
तुकाविप्र म्हणे गर्जा । लावा ध्वजा विठल || ५ ||
संत गोविंद भट
भट गोविंद येकला | वेडा वैदिक देखिला || १ ||
जाले जीवा समाधान । होता तयाचे दर्शन || २ ||
वास जयाचा पंढरिसी | वेड वेदांत जयासी || 3 ||
तुकाविप्र भेटी लाभ | जाला आनंद स्वयंभ || ४ ||
संत कसाब
मांस ही विकले | कसाबा संगती । कंटाळा श्रीपती | धरू नेणे || १ ||
काताड्याच्या राहे | संपुष्टी अखंड । नामाची आवड | ऐसी देवा || २ ||
तुकाविप्र म्हणे | नामासाठी ऐसा । पहा काम कैसा | देव करी || ३ ||
भक्त मीरा
मीराबाई भक्त | प्रेमळ पाहून । विषच पेऊन | घाला तीचे || १ ||
अमृत पाजीले | मीराबाई लागी । धन्य केली जगी | राजकन्या || २ ||
तुकाविप्र म्हणे | ऐसा हा प्रेमळ । अंतर निर्मळ | देवराणा || ३ ||
संत भीऊ माळी – केमी
माळी भीऊबा केमीचा । भोळा प्रेमळ जातीचा || १ ||
सर्वभावे उदासीन । माळी भिऊबा तो धन्य || २ ||
जो का विरक्त निचाड । सर्व गुणे जो निर्भीड || ३ ||
भला एक वितरागी । शुद्ध भाव पांडुरंगी || ४ ||
तुकाविप्र म्हणे भला । वारकरी देखियेला || ५ ||
भक्त मंगळमूर्ती आणि सिद्धीबाई
मूर्ति मंगळ विख्यांत । भोळा प्रेमळ विरक्त || १ ||
सिद्धीबाई अर्ध अंग । धन्ये उभयता योग || २ ||
उपासना गजानन | शांति क्षमा सीळ ध्यान || ३ ||
हे चि डोळा देखियेले । तेणे चित्त संतोषले || ४ ||
तुकाविप्र भक्ती भावा । मूर्ति मंगळ वैष्णवा || ५ ||
संत महादेव – पाग – कोंकण
महादेव भक्त पागवासी | होता पेशव्याच्या सेवेसी || १ ||
एक वीध भाव सीवापासी | निष्ठा जडली कृष्णेश्वरासी || २ ||
वारकऱ्यांचा होता हेत | महादेव न्यावा पंढरीत || ३ ||
महादेव म्हणे वारकऱ्यांसी | नका नेवू पंढरीसी || ४ ||
कृष्णेश्वरी पूर्ण भाव | हाची माझा विठो देव || ५ ||
पाचारावे विठोबासी | माझ्या कृष्णेश्वर भेटीसी || ६ ||
तुकाविप्र म्हणे अपूर्व | योग हरी हर भेट सुदैव || ७ ||
एकनाथ सांप्रदाई संत शिवराम – संत मुकुंद , संत गोडसे शिवराम
येक सिवराम संत | सांप्रदायी येकनाथ || १ ||
गोडसीया सीवराम | भोळा भावीक परम || २ ||
सीस्य कोकीळ स्वामीचा | धन्य मुकुंद नामाचा || ३ ||
तिन्ही संत एक जोली | तूर्त काळे धन्य कली || ४ ||
तुकाविप्र भेटी लाभ | जाला आनंद स्वयंभ || ५ ||
संत रोहिदास
रोहीदासा संगे | जोडे ही शिविले । चर्म रंगविले | देव राये || १ ||
सर्वकाळ नाम | गर्जे रोहीदास । राहिला सेवेस | देव त्याच्या || २ ||
तुकाविप्र म्हणे | याती नेणोदेव । पाही भक्तीभाव | नाम वाचे || ३ ||
संत रोहिदास आणि संत सेना
रोहिदास भक्त | चांभार जातीचा । भोळा विठोबाचा | आवडता || १ ||
कुटूंब सहिता | ऐसा भक्तराज । जाला कीर्तिध्वज | कलयुगी || २ ||
न्हावी सेना तैसा | कुटूंबवत्सल । भक्त या प्रेमळ | विठोबाचा || ३ ||
तुकाविप्र म्हणे | कान्होपात्रा भक्त । विठ्ठल विरक्त | देवाची या || ४ ||
संत चरित्रकार – कवी महीपती
राव महिपत कवि । भोळा विरक्त गोसावी || १ ||
ग्रंथ अपूर्व घडिला । भक्तविजय चांगला || २ ||
शांती क्षमा दया शिळ । शुद्ध भाविक प्रेमळ || ३ ||
तुकाविप्र म्हणे भेटी । जाली पंढरी वैकुंठी || ४ ||
संत रुद्राई महाराज , संत रामनाथ मनसाराम
रुद्राआई महाराज । सिद्ध थोर कीर्तीध्वज || १ ||
वृत्ति पीसाट जगात । योगी निरुपम संत || २ ||
रामनाथ मन्साराम | रुद्राआई तयासम || ३ ||
वेडेपणे होते भले । जग विख्यात जाहाले || ४ ||
तुकाविप्र म्हणे भली । येक रुद्राई देखिली || ५ ||
संत रामलिंग आणि संत सुजात , संत भजलींग आणि संत सुलतान
रामलींग पिंपरीत । शिष्य तयाचा सुजात || १ ||
भजलिंग बाबा धन्ये । शीष्य त्याचा सुलतान || २ ||
सम साम्य गुरू चेले । चौघे पुरुष देखिले || ३ ||
हरीभक्त परायण। ज्ञानी अभंग प्रमाण || ४ ||
तुकाविप्र म्हणे थोर । गुरु चेले धुरंधर || ५ ||
संत लक्ष्मण – चाफळ
लक्षूमण रामदासी । संत चाफळचा वासी || १ ||
योगी उदार विरक्त । सत्वगुणी क्षमा युक्त || २ ||
भक्ती भावार्थे आगळे । ज्ञानी अंतर निर्मळ || ३ ||
तुर्त पट्ट अधिकारी । लक्षूमण आवतारी || ४ ||
तुकाविप्र सुखी होणे । होता तयाचे दर्शने || ५ ||
संत जोतीपंत भागवत
लग्नाचे तातडी | जोतीपंत आला । ठाव मागितला | कृष्णेपाशी || १ ||
कीलक संवत्सर | मार्गीशर मासी । कृष्णतृयोदशी | गुरुवारी || २ ||
वैष्णव गर्जती | वाजवती टाळ । तव प्रदोषकाळ | प्राप्त झाला || ३ ||
ज्योती माजी ज्योती | मिळाली देखून । करीत गायन | तुकाविप्र || ४ ||
संत भिऊबा
वीर भीऊबा सद्भक्त । भोळा प्रेमळ विरक्त || १ ||
विप्रनाथाचा वरदी । वीर भीऊबा सद्बुद्धी || २ ||
विठोबाचा भक्तराज । साक्षात्कारी कीर्तिध्वज || ३ ||
वीर वैष्णव साजिरा | भक्त विठोबाचा तुरा || ४ ||
तुकाविप्र म्हणे भला । भक्त भीऊबा देखिला || ५ ||
संत महादेव – वडगाव
वडगावी संतराव | बाबा एक महादेव || १ ||
सत्वगुणी वीतरागी | ब्रम्हचर्ये धन्य जगी || २ ||
ज्ञान वैराग्य सद्भक्ती | तिन्ही ज्या अंगी वसती || ३ ||
क्षमा दया शांती शीळ | शुद्ध भावीक प्रेमळ || ४ ||
तुकाविप्र सुखरूप | ऐसे पाहोनी स्वरूप || ५ ||
संत वानखंडी
वनखंड योगिराणा | सिद्ध पुरुष देखणा || १ ||
जग विख्यात देखिला । येक वनखंड चांगला || २ ||
निरुपम योगीराव | वनखंडी बाबा देव || ३ ||
तुकाविप्र म्हणे संत । बाबा वनखंड विख्यात || ४ ||
संत कवि शिवराम – पांच पिंपळे
शिवराम कविराव। पांच पिंपळे वैष्णव || १ ||
दुजे आदि नारायण । कवि जोलीचे प्रमाण || २ ||
ऋषी वैष्णव अनंत । ब्रह्मचारी पैठणांत || ३ ||
त्रिवर्गाची भेटी जाली । चित्तवृत्ती संतोषली || ४ ||
तुकाविप्र पतितासी । भेटी ऐसीया संतासी || ५ ||
संत शिवराम आणि संत काशिबाई
शिवराम लेणीयांत । जाले अवतारी संत || १ ||
भीक्षा वृत्ती चालविले । अन्न सर्वत्रासी दिले || २ ||
काशीबाई शिवराम । उभयता निरुपम || ३ ||
सत्व गुणी क्षमाशील । शुद्ध भाविक प्रेमळ || ४ ||
तुकाविप्र म्हणे धन्य । शिवराम एक रत्न || ५ ||
- संत गोपाल केशव, संत मैलगीरी अण्णा , संत महादेव (यातील संत महादेव हे संत तुकाराम महाराज देहुकर यांचे वंशज आहेत)
शुद्ध सात्विक वैष्णव | भोळा गोपाळ केशव || १ ||
आगळा तो सत्व गुणा । तैसा मेलगीरी आण्णा || २ ||
महादेव तुकोबाचा । पंतु पुतळा प्रेमाचा || ३ ||
भेटी त्रिवेणी जाली । चित्तवृत्ती संतोषली || ४ ||
तुकाविप्र सुखी जाला । संत पाहोनी पाऊला || ५ ||
संत कवि शिवराव , संत नारायण कवि , संत अनंत वैष्णव
शिवराव कविराव | झाले पहा वैष्णव || १ ||
दुजे आदी नारायेणे | कवि जोलीचे प्रमाण || २ ||
रूसी वैष्णव अनंत | ब्रम्हचारी पैठणात || ३ ||
त्रीवर्गाची भेटी जाली | चित्त वृत्ती संतोषली || ४ ||
तुकाविप्र पतीतासी | भेटी ऐसीया संतासी || ५ ||
संत शांतलिंग महाराज – विजोरा
शांतलिंग विझोराचे । दास विठ्ठल देवाचे || १ ||
योगी, उदार विरक्त । क्षमा दयाशीळ शांत || २ ||
पुण्य परायण भोळा| साधु उदास मोकळा || ३ ||
भक्ती भावार्थे भरीव | निरुपम संतराव || ४ ||
तुकाविप्र म्हणे थोर । देखियेला शांत नर || ५ ||
कवी श्रीधर यांचा पुत्र मनोहर
श्रीधर स्वामींचा | पुत्र मनोहार । भाऊ नामधार | कथे उभा || १ ||
रामाजी गोसोच्या | घरी तारगांवी । कथा हे बरवी | स्वानंदाची || २ ||
सुखाचा पुतळा | मनोहर जोगी। उभा कथारंगी | नित्यनेमा || ३ ||
तुकाविप्र आज्ञा | धार तया सभे । संतकृपा शोभे | मनोहरी || ४ ||
साजे हे बोलणे मनोहर संता । श्रोते हो ऐकता धन्ये तुम्ही || १ ||
माझीया प्रारब्धे ऐशा प्रसंगाची । आणिले तुम्हास पाहावया || २ ||
श्रोत्या वक्त्याचे पाहीले चेरण । प्रारब्ध प्रमाण धन्य माझे || ३ ||
तुकाविप्र सुख स्वानंद भरीत । सूचना बहूत सद्गुणीया || ४ ||
सापडला ज्ञानी अद्वैत बोधाचा । ढीगारा प्रेमाचा मनोहर || १ ||
शसी मनोहार चकोर हे श्रोते । तुका कचा तेथे काय कीती || २ ||
सहश्र भोजेनी आगांतूक येक । ने घे पायी मुर्ख मानील तो || ३ ||
तुकाविप्र पाथी सहश्रा कौतुक । आगांतूक यक बैसवीला || ४ ||
संत बोधले बाबा
सेतची पेरले | बोधल्या बाबाचे । कौतुक देवाचे | अघटीत || १ ||
आणिली कणसे | थोटीया ताटासी । दाविले जनासी | उघडची || २ ||
तुकाविप्र म्हणे | विठ्ठल या देवे । भरियेली पेवे | बोधल्याची || ३ ||
संत सेना महाराज
सेना न्हाव्याचे काम देवे केले । डोई केली रायास रिझविले || १ ||
उंच नीच देवास ठावे नाही । कोणे जातीचा भक्त कोणे देही || २ ||
तुकाविप्र तारील यात काये । देवराया नवल कीती आहे || ३ ||
सेना न्हावी जसवंत | थोर भक्त केले हे || ४ ||
रंगनाथ रामदास | कृष्णदास जैराम || ५ ||
महाराजा कृपाधना | ऐसा दीना उद्धरी || ६ ||
तुकाविप्र म्हणे हाती | धरी प्रीती अनाथा || ७ ||
सर्व संत ज्ञानदेव एकनाथ सोपान
सूरदास मानपुरी | स्वर्णगिरी निवृत्ती || १ ||
ज्ञानदेव एकनाथ | रुक्मापंत सोपान || २ ||
निंबराज शांतलिंग | देव चांग नानक || ३ ||
तुकाविप्र म्हणे हरी | ऐसी करी कृपा की || ४ ||
संत बाबा भोज – धामनगांव
संत भोळा बाबा भोज । धामणगांवी बोधराज || १ ||
निरुपम भक्ती भाव । जया घरी बसे देव || २ ||
शांति क्षमा दयासीळ । साधु अंतर निर्मळ || ३ ||
बोधल्याचे कुळी धन्ये । बाबा भोज एक रत्न || ४ ||
तुकाविप्र भेटी होता । लाभ रासी अगणिता || ५ ||
संत अवधूत बाबा रोपळेकर – एकनाथ वंशीय
साधु येक रोपळ्यात | बाबा नामे अवधूत || १ ||
एकनाथ वंशावळी ।वृत्ति त्याची भोळी || २ ||
बाबा अवधूत भोळा। एक शांतीचा पुतळा || ३ ||
निरुपण योगी राणा। सत्वगुणी या देखणा || ४ ||
तुकाविप्र भेटी भाव | अवधूत संतराव || ५ ||
संत संतोबा पवार , संत माणकोजी बोधले
संतोबा पवार शूरत्वे आगळा | शुद्ध भक्त भोळा विठोबाचा || १ ||
कुटुंब सहित माणकोजी बावा | बोधला वैष्णवा – माजी वंद्ये || २ ||
ममतावा कांता भागीरथी सुन | स सूत्र निधान येमधर्म || ३ ||
नातू भगवंत पंतु भोजराज | ऐसे कीर्ती ध्वज आजीवर || ४ ||
तुकाविप्र म्हणे दास विठोबाचे | विजयी नेमाचे त्रिभुवनी || ५ ||
संत शंकर बाबा
सांप्रदाई तुकोबाचा । वारकरी पंढरीचा || १ ||
शंकराजी बाबा संत । साधु प्रसिद्ध विरक्त || २ ||
देखियेले पंढरीसी । सुख, जाहाले जीवासी || ३ ||
तुकाविप्र म्हणे भेटी । चंद्रभागा वाळंवंटी || ४ ||
सखाराम विठोबाचा । वासी येक पंढरीचा || १ ||
भोळा विरक्त प्रेमळ । साधु अंतर निर्मळ || २ ||
सत्वगुणी वीतरागी । वेडा दिसतसे जगी || ३ ||
तुकाविप्र भेटी लाभ । पारी गरुड स्वयंभ || ४ ||
संत ज्ञानेश्वर
ज्ञानराजया विष्णु दैवता । नमन तुजला विनंती हे आता || १ ||
येकनाथजी ज्ञानराजया । येकची करा पूर्ण ते दया || २ ||
ज्ञानदेव तूं येकनाथजी । विनवणी कृपा करी ते आजी || ३ ||
तुकली तनु पाहिजे प्रीती । विप्र नाम या ज्ञानसंपत्ती || ४ ||
ज्ञानेश्वर येक-नाथ महाराजे | वेदार्थ गुढ जे | उगवीले || १ ||
दूर होत्या जव-ळची आल्या गोष्टी | उघडी या द्रीष्टी | ब्रह्मडोळा || २ ||
तुकाविप्र म्हणे प्रसिद्धची थोर । केले उपकार | संतानीया || ३ ||
ज्ञानेश्वरा ऐसे अवतार जाले । पंढरीसी गेले खेळावया || १ ||
नामदेवा संगे खेळले हुतुतू । वेदश्रुति तंतू धरोनिया || २ ||
तुम्ही आम्ही खेळू आपुलीया पाडे । घेऊ फाडो वाटे लाभ रासी || ३ ||
तुकाविप्र म्हणे पंढरी खेळावे । कीर्तिध्वज व्हावे त्रिभुवनी || ४ ||
ज्ञानदेव सेवे गुरु | ग्रंथी आला प्रेम पुरु || १ ||
ज्ञानदेवी नोहे टीका । स्वधर्म तारु हे नौका || २ ||
गुरुसेवेचे हे सार । ज्ञानदेवी ग्रंथ थोर || ३ ||
भाविकांसी कल्पद्रुम । तुकाविप्र पूर्ण काम || ४ ||
विष्णु अवतार ज्ञानदेव संत। प्रमाण कलीत चालविती भिंताडे || १ ||
पशु रेडा वेद बोलाविला ज्यांनी प्रसिद्ध पैठणी गौतमीचे तटाकी || २ ||
भुदेवा संतोष बहुतचि केला । सत्य उगविला गीतार्थ जयाला || ३ ||
तुकाविप्र ऐसे थोर ज्ञानदेव । ज्यानी केला भव अवघाची कोरडा || ४ ||
आवतार हे देव कलयुगी । ज्ञानदेव मानव तनु जगी || १ ||
उद्धराया पतीत जन लोका। जड मुढ आनाथ दिनरंका || २ ||
तुकाविप्र आभंग आवडीचा । ज्ञानदेव उघडा प्रचीतीचा || ३ ||
सर्व संत ज्ञानेश्वर, मुकताबाई , निवृत्ती , सोपान, जनार्दन पंत, एकनाथ
ज्ञानेश्वर मुक्ता | निऊर्ती सोपान । जाले युगी धन्ये | याची ऐसे || १ ||
विठ्ठली जयाची | अत्यंत आवडी । विठोबाचे गडी | बरोबरी || २ ||
जनार्दन पंत | प्रसिद्ध विठ्ठल । भक्त वोळखीले | येकोबानी || ३ ||
तुकाविप्र ऐसी | भक्ती निरूपम | विठ्ठल सप्रेम | कलयुगी || ४ ||