संत तुकाविप्र रचित भीमराज चरित्र

संत तुकाविप्र रचित भीमराज चरित्र

संत तुकाविप्र रचित भीमराज चरित्र

वारकरी पंथातील विभूतींशी वेदमूर्तींची जसा संत तुकाविप्र यांचा परिचय होता तसाच रामदास पंथांशीही जिव्हाळा होता. जवळच्या गादीचे तत्कालीन पट्टअधिकारी लक्ष्मण रामदासी हे संत तुकाविप्र यांच्या पूर्ण परिचयाचे होते. कल्याण मठाचे अधिकारी भीमराज ब्रह्मचारी हे संत तुकाविप्र यांच्या पेक्षा वयाने 25 वर्षांनी वडील असून संत तुकाविप्र त्यांना गुरुस्थानी मानीत
शके 1692 – 93 च्या वहीत समकालीन संतांसंबंधी संत तुकावीप्रांनी जे उद्गार काढलेले आहेत त्यात या दोघांचाही उल्लेख आहे
माग शुद्ध 13 शके सतराशे दहा किलकनाम संवत्सरे रविवारी भीमराज दादा रामरुप झाले. या प्रसंगाचे संत तुकाविप्र यांनी वर्णन केले ते अभंग

अभंग साडेचौ चरणी

आद्यब्रम्हा पासूनीया परंपरा
सर्वोत्तम खरा नारायण श्रीविष्णु ||१||
त्यापासून ऋषी वसिष्ठ प्रमाण
समर्थ ब्राह्मण गुरु रामचंद्रासी ||२||
रामचंद्रा पासूनीया बलभीम
सदभक्त निस्सिम ब्रह्मचारी समर्थ ||३||
त्यांनी कलयूगी रामदासा प्रति
अनुग्रह प्रीती केला कृष्णा तेरी या ||४||
तुकावीप्र म्हणे तयांनी कल्याण
बोधिले प्रमाण ग्रंथ युक्ती करोनी ||५||


अभंग साडेचौ चरणी

अमृत रायजी महा पराक्रमी
राजमान्य नामी ऋग्वेदी ब्राह्मण ||१ ||
रामदास स्वामी तयासी भेटले
तयाचे जाहले अनुग्रही प्रेमळ ||२||
भरीव भावाचे विश्वासाचे पुरे
निर्मळ अंतरे सेवेमाजी तत्पर ||३ ||
कसोनी पाहिले निभावले जेव्हा
कल्याण हे तेव्हा नाम देणे गुरुचे ||४ ||
तुकावीप्र म्हणे सद्गुरु प्रसादे
राहिले आनंदे डोमगाव नगरी ||५ ||


पद तोडी

डोमागावी शिष्य बहुत जाहले
त्यामध्ये मुधाबा अधिक पाहिले ||१||
गुरुभक्त ज्ञानी वैरागी पाहून
संस्थानी तयासी ठेविले स्थापुन ||२||
नामसंकीर्तने देहे ठेवीयेला
दानधर्म सर्व वेदमान्य केला ||३||
त्यावरी मुधाबा समर्थ बैरागी
धन्य गुरुभक्त मान्य झाले जगी ||४||
तुकाविप्र म्हणे देह अवसानी
स्थापलेले भीम राज महा ज्ञानी ||५||


पद तोडी
सर्वही शिष्याची परीक्षा पाहिली
भीमराज मूर्ती कसी उतरली ||१||
निष्काम नीचाड योग्य संस्थानासी
ऐसे भीमराज आले परीक्षेची ||२||
मग समारंभ अपूर्वची केला
संत समुदाय सर्व मेळविला ||३||
अद्भुत आनंद झाला सर्वत्रि
संस्थानाशी धनी होता अवतारी||४||
तुकाविप्र म्हणे योग्ययोग्य झाले
सांप्रदायी सर्व आनंद पावले ||५||


अभंग साडेचौ चरणी

गुरुभक्त दादा भीमराज संत |
संस्थानी विख्यात डोमगांव सत्क्षेत्री ||१||
निस्पृही नैष्टीक आंतर निर्मळ
भावीक प्रेमळ दयावंत सात्विक ||२||
उदार विरक्त सर्वाभूती सम
पहाणे श्रीराम सर्वकाळ सहज ||३||
ऐसा योगीराणा समर्थ ब्राम्हण
ऋग्वेदी प्रमाण कुलवंत सुकृत ||४||
तुकाविप्र म्हणे नित्य नेमे राम
स्मरण सप्रेम रामकिर्ती प्रताप ||५||


अभंग साडेचौ चरणी
कल्याण स्वामीच्या संस्थानासि योग्य
सकळची भाग्य कर्मधर्मी निपुण ||१||
स्नान संध्यासीळ स्मरणी सादर
श्रीराम उच्चार सर्व काळ वाणीसी ||२||
उत्सव करणे मोठ्या आनंदात
सन्मानावे संत बहुमाने करोंनी ||३||
तुकाविप्र म्हणे अमृत रसाळ
वाणी सर्वकाळ प्रियकर हिताची ||४||


पद
ऐसे भीमराज भीमराज | गुरुभक्त महाराज ||धृ||
ध्यानमुळ गुरुमूर्ती ऐसे | अभंग ज्याचे चित्ती ||१||
पूजामुळ पाऊले गुरुंची | सर्वही भावे निष्ठा हेची ||२||
मंत्रमुळ श्री गुरु वाणी | मोक्ष कृपा गुरु साहेब धणी ||३||
ब्रह्मा विष्णु सीव श्री ध्यान | गुरु श्री परब्रह्म निधान ||४||
तुकाविप्र म्हणे ऐसीया | नमन साष्टांग योगिया ||५||


अभंग चौ चरणी
देवूळ कल्याण स्वामीचे बांधिले |
आपूर्व चांगले सिखराचे ||१||
कासी क्षेत्र हेची सद्गुरुचे स्थान |
विश्वेश्वर ध्यान गुरुदेव ||२||
गुरु चरण हे भागीर्थीचे जळ |
जयाचे निर्मळ प्रेम ऐसे ||३||
पंच्यांसी वर्षाचे वय होत आले |
प्रयाण कळले निजधामा ||४ ||
तुकाविप्र म्हणे सांगितले सर्वा |
संबंधी वैष्णवा सर्वोत्तमा ||५||


सौरी
संप्रदाई सर्व लोक इष्ट मित्र आले |
मंडपात सभेचिया थाट जमा जाले ||१||
राम राम सीताकांत राम राम राम |
सकळही गर्जताती दाशरथी राम ||२||
तुंबळ हा घोष जाला टाळ मृदुंगाचा |
चिपळीया चंग विणे ढोल दमास्याचा ||३||
तुकाविप्र म्हणे माघ शुद्ध त्रयोदशी |
लागलेती आपुलीया सत्य सार्थकासी ||४||

१०
छंद
सर्वही जना हित सांगती | भक्त व्हा गुरु हेची मागती ||१||
कीर्ती गाजवा संत या सभे | प्रीतीने रहा कीर्तनी उभे ||२||
नाम गाजवा कुळ गोत्रीचे | सांगणे प्रीती हेची आमूचे ||३||
या रीती जना हित सांगोनी |जानकी पती ध्यान हे मनी ||४||
ते तुका घडी विप्र चांगली | भूमी मंडळा दिव्य शोभली ||५||

११
पद
श्रम हरिणीचे तीरी संत श्री भीम हे अवतारी ||धृ||
प्रयाणाचे समयी राम गर्जती नाना परी ||१||
सद्गुरू नाथा करूनी नमन | पाहिली मूर्ती खरी ||२||
सार्थक जाले धरील्या तनूचे | साधीली युक्ति बरी ||३||
तुकाविप्र गर्जत उभा | कीर्तन श्री गजरी ||४||

१२
दु चरणी
सनातन सर्वोत्तम | पूर्ण पर ब्रह्मराम ||१||
ध्यानी मनी सद चिद | भरोनीया घनानंद ||२||
ऐसा सधन सुंदर | नाम कीर्तन गजर ||३||
देह ठेवाया आपाला | प्रीती मांडी द्यावयाला ||३||
महारुद्र आपा आले | मांडी देवोनी बैसले ||४||
मांडी देता उशाखाली | राम हारळी मारली ||५||
तुकाविप्र संकीर्तने | जाले देह अवसाने ||६||

१३
अभंग साडे चौ चरणी

शालिवाहन शक सत्रासे दाहात | भीमराज संत निजधाम पावले ||१||
संवछर् नाम किलक चांगला | रविवारी जाला आवतार समाप्त ||२||
पुण्य पावन संतांचे चरित्र | गातील पवित्र त्यासी पुण्य जोडेल ||३||
मनोरथ पुण्य सहज होतील | आवडी गातील नित्य नेमे त्याचे ||४||
तुकाविप्र म्हणे सहज सफळ | होता हे सकळ संत कथा गाईल्या ||५||

१४
अभंग साडे चौ चरणी

नमन विनंती आद्य ब्रह्मरूपा | पूर्ण किजे कृपा महा विष्णु देवाजी ||१||
वसिष्ठ स्वामिया रामचंद्र देवा | मारुती वैष्णवा रामदास स्वामिया ||२||
कल्याण समर्था मुधावा देवाजी | नमन भिमाजी संत राया उदारा ||३||
महारुद्र आपा प्रस्तुत संस्थानी | प्रस्तुत होवोनी ज्ञान दिजे अभंग ||४||
तुकाविप्र म्हणे बापू नित्यनेमे | चरित्र सप्रेमे गात प्रीती असावे ||५||

Scroll to Top